Afghanistan Crisis : पश्चिम बंगालचे जवळपास २०० नागरिक अफगाणिस्तानात अडकल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं बुधवारी याबाबतची पुष्टी केली आहे. अफगाणिस्तानातील अडकलेल्या नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी एक विशेष समितीची नियुक्ती केल्याची माहिती ममता बॅनर्जी सरकारनं दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव एचके द्विवेदी यांनीही परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून याबाबतची सूचना केली आहे. सर्व नागरिक सुखरूप परत येतील अशी आशा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. (About 200 people from Bengal are stranded in Afghanistan, Chief Secretary wrote a letter to MEA to bring them back)
अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या प.बंगालच्या २०० नागरिकांपैकी बहुतेक जण दार्जिलिंग आणि कार्सियांग येथील आहेत. याबाबत ममता बॅनर्जी यांनी याआधीच अफगाणिस्तानात असलेल्या प.बंगालमधील नागरिकांची माहिती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. केंद्र सरकार भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्हाला आशा आहे सर्वजण सुखरूप परततील. याबाबत मला आणखी काही टिप्पणी करू इच्छित नाही कारण हे अतिशय संवेदनशील प्रकरण आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
कोलकातातील अफगाणी नागरिकांनाही सुरक्षा देण्याचे आदेशप.बंगालमधील अफगाणी नागरिकांच्या सुरक्षेचे आदेश देखील मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी दिले आहेत. अनेक अफगाणी नागरिक व्यापारासाठी कोलकातामध्ये ये-जा करत असतात. दरम्यान अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे हे नागरिक आता चिंताग्रस्त झाले आहे. या सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर ती राज्य सचिवालयाकडून केली जावी, असेही निर्देश ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत.