न्यूयॉर्क : अफगाणिस्तानात हिंसक जिहाद आणि अमेरिकेत दहशतवाद प्रशिक्षण शिबीर भरवण्यासाठी मदत केल्याप्रकरणी ब्रिटिश नागरिक अबू हमजा यास येथील एका न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मुस्तफा कामिल मुस्तफा अर्थात अबू हमजा (५६) यास दहशतवादाशी संबंधित ११ प्रकरणांत जिल्हा न्यायाधीशांकडून येत्या नऊ सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावली जाईल. अबू हमजा १९९८ मध्ये येमेन येथील ओलीस प्रकरणात सहभागी असल्याचे आढळला आहे. १९९९ मध्ये ओरेगान येथे दहशतवाद प्रशिक्षण शिबीर उभारण्याचा कट तथा २००० आणि २००१ मध्ये अफगाणिस्तानात हिंसक जिहादमध्ये सहकार्य केल्याच्या प्रकरणातही अबू हमजा दोषी आढळला आहे. येमेनमध्ये १६ परदेशी पर्यटकांच्या वाहनांवर हल्ला करून त्याने पर्यटकांना ओलीस ठेवले होते. त्यात दोन अमेरिकी पर्यटक होते. चार आठवड्यांची सुनावणी आणि दोन दिवसांच्या चर्चेनंतर ज्यूरींनी सोमवारी सर्वसहमतीने हमजा ११ प्रकरणांत दोषी असल्याचा निकाल दिला. अबू हमजा हा ब्रिटिश नागरिक असून आॅक्टोबर २०१२ मध्ये त्याचे ब्रिटिश सरकारने अमेरिकेस प्रत्यार्पण केले होते. दरम्यान, अबू हमजा संपूर्ण सुनावणीदरम्यान आपण ब्रिटिश गुप्तचर संस्था एमआय-५ ला मदत केल्याचा दावा करीत राहिला. हमजा यास त्याने जे बोलत होता त्यासाठी नाही, तर त्याने जे केले त्यासाठी दोषी ठरविण्यात आले आहे, असे भरारा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
दहशतवादी कृत्यांत अबू हमजाचा हात
By admin | Published: May 21, 2014 1:51 AM