रात्री उशिरा झोपून, भल्या पहाटे उठून, स्वयंपाक करून, डबे भरून, घाईघाईने ऑफिस गाठणाऱ्या लोकांचे सगळ्यात मोठे शत्रू कोण असतील, तर दुपारी २ ते ५ च्या दरम्यान मिटिंग किंवा प्रेझेंटेशन ठेवणारे लोक. आधीच झोप येत असते. जमलं तर डेस्कवर डोकं टेकवून का असेना दहा मिनिटांची डुलकी काढावी असं वाटत असतं आणि अशावेळी ऐन ट्रॅफिकमधून गाडी चालवत, घाम पुसत कुठेतरी जायचं आणि जांभया दाबत दाबत चहा, कॉफी पीत पीत प्रेझेंटेशन बघायचं हा जगातला सगळ्यात रटाळ प्रकार असतो आणि तो सगळ्यांच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा येतोच. अशावेळी त्या मिटिंग किंवा प्रेझेंटेशनला जायला आपल्याला एसी बस मिळाली तर? तीही शांत झोपण्यासाठी डिझाईन केलेली? तर आपल्या ऑफिसमधून निघायचं, बसमध्ये एक मस्त डुलकी ऊर्फ वामकुक्षी ऊर्फ नॅप काढायची आणि फ्रेश मूडमध्ये मिटिंगला पोहोचायचं. कधीच झोप पूर्ण न होणाऱ्या दमल्या भागलेल्या हाँगकाँग शहरवासीयांसाठी तिथल्या एका बस कंपनीने अशी पाच तासांची झोप घेता येणारी एसी बस सुरु केली आहे.
आधीच झोप येणाऱ्या माणसांना बसच्या चालण्याच्या लयीत पटकन आणि शांत झोप लागेल यात काही शंकाच नाही. अर्थात बहुतेक सगळ्या देशांमध्ये आणि कंपन्यांमध्ये कामाच्या वेळात अशी डुलकी काढायची तर ती चोरूनच काढावी लागणार. कारण कामाच्या ठिकाणी झोपणं हे थेट तुम्ही अकार्यक्षम असण्याचं लक्षण मानलं जातं. कामाच्या ठिकाणी झोपल्याबद्दल वरिष्ठांकडून कानउघाडणी होण्यापासून ते थेट नोकरी जाण्यापर्यंत वेगवेगळ्या परिणामांना लोकांना तोंड द्यावं लागू शकतं.
अत्यंत कार्यक्षम आणि कामाला वाहून घेणाऱ्या जपानमध्ये मात्र कामाच्या ठिकाणी झोपलेल्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदीच वेगळा आहे. इतकंच नाही, तर त्यासाठी एक वेगळा शब्द तिथे वापरला जातो, इनेमुरी. इनेमुरीचा अर्थ ‘झोपलेलं असतानाही हजर असणे’. जपानी लोक कामाला वाहून घेण्यासाठी जगप्रसिद्ध आहेत. त्यामुळे एखादा माणूस कामाच्या ठिकाणी टेबलवर डोकं टेकवून डुलकी काढत असेल तर त्याच्याकडे कोणी तुच्छतेने बघत नाही. उलट असं गृहीत धरलं जातं की तो काम करून इतका दमला आहे की त्याला जागं राहणं अशक्य झालं आहे. जपानमध्ये सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये, बस स्टॉप किंवा रेल्वे स्टेशनवर अशी थकून झोपून गेलेली माणसं दिसणं हा अगदी नेहमीचा भाग आहे.
कामावर झोपलेल्या माणसाकडे कसं बघायचं हा ज्या त्या संस्कृती आणि दृष्टिकोनाचा भाग असतो, मात्र खरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की माणसांना कामाच्या ठिकाणी आल्यावर झोपावंसं का वाटतं? ते इतके कशाने दमतात? आणि त्याचं उत्तर जे आहे ते देश आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन आरोग्याशी निगडित आहे. आजच्या वेगवान झालेल्या आयुष्यात माणसांना पुरेशी झोप मिळत नाही हे त्याचं खरं कारण आहे. प्रत्येक माणसाची झोपेची गरज वेगवेगळी असते, परंतु साधारण १८ ते ६५ या वयोगटातील व्यक्तींना रोज ७ ते ९ तास झोपेची गरज असते. ती गरज आताच्या धकाधकीच्या आयुष्यात पुरी होत नाही. अमेरिकेत केला गेलेला एक अभ्यास असं सांगतो की अमेरिकेतील सुमारे ७० टक्के लोकांची झोप पूर्ण होत नाही. अमेरिकेत दिसणारं हे प्रमाण थोड्याफार फरकाने जगभर सारखंच असणार आहे आणि मग अर्थातच अपुरी झोप झालेली ही माणसं कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. इतकंच नाही, तर अपुऱ्या झोपेमुळे अनेक प्रकारची गुंतागुंत माणसांच्या आयुष्यात तयार होते.
झोप पूर्ण न होणे या आजाराने अक्षरशः जगाला ग्रासलेलं आहे. त्यामागची कारणं अनेक आहेत. शहरात राहणाऱ्या लोकांचा प्रवासात खूप वेळ जातो. हे त्यातलं एक मोठं कारण आहे. त्याशिवाय सततच्या स्पर्धेमुळे जास्तीत जास्त वेळ काम करण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव हेही कारण आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे प्रचंड वाढलेला स्क्रीन टाईम! २०१७ साली नेटफ्लिक्सचा सीईओ रीड हॅस्टिंग्ज याने असं वक्तव्य केलं होतं की “आमची खरी स्पर्धा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मशी नसून झोपेशी आहे. तुम्हाला एखादा शो इतका बघावासा वाटतो की तुम्ही झोपेचा बळी देऊन रात्रभर जागे राहून नेटफ्लिक्स बघता.” त्यावेळी हे वाक्य तितकंसं गांभीर्याने घेतलं गेलं नाही. पण दिवसेंदिवस झोप आणि स्क्रीन टाईम यात स्क्रीन टाइम जिंकताना दिसतो आहे आणि त्यात बळी मात्र माणसांचा जातो आहे.