टोक्यो : गेली शेकडो वर्षे जेथे महिलांना पूर्ण प्रवेशबंदी आहे व पुरुषांनाही पूर्ण नग्नावस्थेत समुद्रस्नान केल्यानंतरच प्रवेश करू दिला जातो अशा जपानच्या ‘ओकिनोशिमा’ या छोट्या बेटाचा ‘युनेस्को’ने जागतिक सांस्कृतिक वारसायादीत समावेश केला आहे. जपानच्या इतिहासात ‘मुनाकाटा तैशा’ या सागरदेवतेचे जागृत स्थान म्हणून ‘ओकिनोशिमा’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जपानच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात दक्षिणेकडील क्युश्यू या बेटाच्या वायव्य किनाऱ्यालगत ‘ओकिनोशिमा’हा एक छोटासा समुद्रातून वर आलेला टेकडीवजा भूभाग आहे.प्राचीन काळापासून जपानच्या कोरियन द्वीपकल्प व चीनशी व्यापार करण्याच्या सागरी मार्गावरील महत्तवाचा पडाव म्हणून ‘ओकिनोशिमा’ची ओळख आहे. तिथे सागरदेवतेचे जागृत स्थान असल्याची श्रद्धा आहे. ‘शिंतो’ पंथाचा पुजारी देवस्थानच्या देखभालीसाठी असतो. देवतेचा वर्षातून एकदा व तोही दोन तासांसाठी उत्सव असतो. त्यावेळी मर्यादित संख्येने बाहेरच्यांना प्रवेश दिला जातो. यंदाच्या उत्सवाला संख्या २०० होती. येथे महिलांचा प्रवेश पूर्णपणे निषिद्ध असून बाहेरून येणाऱ्या पुरुषांनाही पूर्ण नग्नावस्थेत समुद्रस्नान करून ‘शुद्ध’ झाल्यावरच येथे पाय ठेवू दिला जातो. सागरी सफरींच्या यशासाठी व देशाच्या समृद्धीसाठी ‘मुनाकाटा तैशा’ देवस्थानाला कौल लावून मौल्यवान वस्तू देवतेला अर्पण करण्याची शेकडो वर्षांची प्रथा आहे. अशा हजारो सोन्याच्या अंगठ्या व अन्य प्राचीन मौल्यवान वस्तू तेथे सापडल्या आहेत. जागतिक सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळाले की तिथे पर्यटकांची रीघ लागते. म्हणूनच यापुढे बेटावर पुजाऱ्यांखेरीज बाहेरच्या अन्य कोणालाच प्रवेश न देण्याचा विचार आहे. महिलांच्या प्रवेशबंदीचा खुलासा करताना ‘मुनाकाटा तैशा’ देवस्थानचा प्रवक्ता म्हणाला की, प्रवेशबंदी फक्त महिलांनाच आहे, असे म्हणणे बरोबर नाही. खरे तर वर्षाचे ३६५ दिवस पूजा-अर्चा करणाऱ्या पुजाऱ्याखेरीज तिथे कोणालाच प्रवेश नाही. वार्षिक उत्सवालाही महिलांना मज्जाव केला जातो, पण लैंगिक भेदभावामुळे नव्हे. महिला भावी पिढ्यांच्या जन्मदात्री असल्याने येथपर्यंतचा खडतर प्रवास करून त्यांचा जीव धोक्यात घालू नये, असे आम्ही मानतो.
शेकडो वर्षांपासून महिलांना प्रवेशबंदी
By admin | Published: July 13, 2017 12:28 AM