कैदेतून पळण्यासाठी आरोपी अनेक क्लुप्ता लढवत असतात. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथील कोर्टामधून एक आरोपी स्पायडरमॅन स्टाईलमध्ये पळाल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या घटनेने कोर्टाच्या आवारातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
ही घटना जोहान्सबर्गमधील जेप्पे कोर्टाच्या परिसरात घडली आहे. येथे आरोपी ओनोशाला थांडो साडिकी याला चोरी आणि घरात घुसखोरीच्या गुन्ह्याप्रकरणी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सुनावणीदरम्यान, जेव्हा मॅजिस्ट्रेट बोलत होते, तेव्हा साडिकी हा अचानक कोर्टरूमच्या दरवाजातून बाहेर निघून गेला. तो इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोहोचला. तिथून खिडकीवरून तो हळुहळू खाली उतरू लागला. त्यानंतर भिंतींवरून घसरून खाली आला आणि शेवटी उडी मारून जमिनीवर उतरला. अशा प्रकारे सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यात आरोपी यशस्वी झाला.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी साडिकी हा एखाद्या सराईताप्रमाणे अगदी आरामात इमारतीवरून खाली उतरताना दिसत आहे.