ऑनलाइन लोकमत
सेऊल, दि. 17 - जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन आणि मेमरी कार्ड निर्माता कंपनी सॅमसंगच्या प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती पार्क ग्वेन यांना लाच दिल्याच्या आरोपाखाली जे वाय ली यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयात तब्बल 10 तास सुनावणी सुरु होती.
ली यांनी 36 मिलिअन डॉलर्सची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. दोन कंपन्यांचं विलिनीकरण करण्यासाठी समर्थन मिळावं यासाठी त्यांनी ही लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं आरोपात म्हटलं आहे. ली यांच्या अटकेचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाला असून, खूप मोठी घसरण नोंद झाली आहे.
सध्या त्यांना फक्त अटक झाली असून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यांना जामीन मिळेल असं सॅमसंगच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.