पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात माजी पंतप्रधान इम्रान खान देखील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पाकिस्तानच्या एआरवाय वृत्तसंस्थेनं दिली आहे. हा हल्ला करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीने हा हल्ला का केला याचे कारण सांगितले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
माजी पंतप्रधान इम्रान खान लोकांची दिशाभूल करत होते, म्हणून मी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मला फक्त त्यांनाच मारायचे होते. या हल्ल्यापाठिमागे कोणाचाही हात नाही. मी स्वत:त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, मी गेल्या चार दिवसापासून हल्ल्याच्या प्रयत्नात होतो, अशी कबुली हल्ला करणाऱ्या आरोपीने दिली आहे. हा व्हिडिओ हमीद मीर नावाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खान यांनी सध्या पाकिस्तानात 'आझादी मोर्चा' काढला आहे. सरकार विरोधी लढ्यात ते रस्त्यावर उतरले आहेत आणि निदर्शनं करत आहेत. ज्या दिवसापासून इम्रान खान तोशखाना प्रकरणात दोषी ठरवले गेले आहेत. तेव्हापासूनच त्यांनी आझादी मोर्चाला सुरुवात केली आहे. याच अंतर्गत गुरुवारी वजिराबाद येथे मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं. यात स्वत: इम्रान खान देखील सहभागी झाले होते.
वजिराबाद येथे रॅली सुरू असतानाच गोळीबार झाला आहे. इम्रान खान यांच्या कंटेनरजवळ वजीराबाद येथील जफर अली खान चौकाजवळ गोळीबार झाल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे. इम्रान खान यांच्यासोबतच माजी राज्यपाल इमरान इस्मेल देखील जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.