मार्सिले, दि. 18 - फ्रान्समधील मार्सिले शहरात चार विद्यार्थ्यांवर एका महिलेने अॅसिड हल्ला केला आहे. रेल्वे स्थानकावर हा हल्ला झाला. महिलेने हायड्रोक्लॉरिक अॅसिड हल्ला केल्याने विद्यार्थी जखमी झाले होते. अॅसिडमुळे त्यांच्यातील काहीजण भाजले गेले होते. दोघांच्या चेह-याला जखमा झाला असून, एका विद्यार्थ्यांच्या डोळ्याला इजा झाली आहे. उपचार केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. हे सर्वजण बोस्टन कॉलेजचे विद्यार्थी आहेत. हल्लेखोर महिला मानसिक रुग्ण असण्याची शक्यता आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.
हल्ल्याचा तपास सुरु असून प्राथमिक तपासादरम्यान दहशतवादी हल्ला असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र हा दहशतवादी हल्ला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. हल्ल्यामुळे कोणताही धोका निर्माण झाला नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मार्सिले - सेंट चार्ल्स रेल्वे स्थानकावर महिलेने हा हल्ला केला. हल्ल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या एकूण 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर महिलेने विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर अॅसिड स्प्रे मारला होता. आपल्या जवळ असणा-या लोकांना महिला टार्गेट करत होती. दरम्यान हल्ला दहशतवादी नव्हता हेदेखील स्पष्ट झालं आहे. तसंच विद्यार्थ्यांवर हल्ला होण्यामागे त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा काहीच संबंध नसल्याचंही सुत्रांकडून कळलं आहे.
पोलिसांनी हल्लेखोर महिलेला ताब्यात घेतलं असून, तरुणपणी आपल्यावरही अशाप्रकारे अॅसिड हल्ला झाला होता असं सांगत तिने आपलं कृत्याचं समर्थन केलं आहे.