वॉशिंग्टन : जगाच्या विविध भागात आणि भारतीय सीमेवरही चीनने संरक्षणक्षमता वाढवून अधिक सैनिक तैनात केल्याचे म्हटले आहे. पूर्व आशियाचे संरक्षण उपमंत्री अब्राहम एम डेनमार्क यांनी सांगितले की, भारतीय सीमेनजीकच्या प्रदेशात चीनी लष्कराची क्षमता आणि संख्या यांच्यात वाढ झाल्याचे आम्हाला दिसून आले आहे. मात्र असे करण्यामागे चीनचा हेतू काय? हे सांगणे कठीण आहे. भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यावर अमेरिकेचा भर कायम राहील. केवळ चीनला समोर ठेवून आम्ही भारताशी संबंध वाढवित आहोत, असे नव्हे तर भारत हा स्वत:च एक महत्त्वाचा देश आहे. हे महत्त्व पाहूनच आम्ही भारताशी संवाद चालू ठेवत आहोत, असे ते म्हणाले. तिबेटमध्येही चीनने आपला लष्करी स्तर आणखी वाढविला आहे. अमेरिकी संरक्षण मंत्रालयाच्या या अहवालात जगाच्या विविध भागात आणि त्यातही पाकिस्तानात लष्करी तळ स्थापन करण्याच्या चीनच्या प्रयत्नाबद्दल सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिरिक्त लष्कर तैनात करण्याच्या चीनच्या कृतीवर या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर लडाखमध्ये सप्टेंबर २०१५मध्ये भारत व चीन यांच्यात लष्करी तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर उभय देशांच्या वरिष्ठ स्तरावर फ्लॅग आॅफिसर्सची बैठक घेण्यात आली. त्यात या भागात शांतता कायम ठेवण्यावर सहमती झाली व दोन्ही देशांचे सैनिक जागेवर परत गेले, या घटनेकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
भारत सीमेवर चीनकडून अतिरिक्त लष्कर तैनात
By admin | Published: May 15, 2016 5:10 AM