गुन्हेगार पकडणे असो किंवा हरवलेल्या मुलाची ओळख पटवणे असो, बोटांचे ठसे नेहमीच उपयोगी पडतात. ओळखपत्र काढायला गेल्यावर सगळ्यात आधी बोटांचे ठसे घेतले जातात, बाकीच्या गोष्टी नंतर होतात. परंतु एक असा आजार आहे, ज्यामुळे बोटांचे ठसे नष्ट होत आहेत.
बोटांचे ठसे जवळजवळ जगभरात नैसर्गिक ओळख म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या आजाराचा सर्वात मोठा तोटा म्हणजे ओळखीचा मुद्दा...बोटांचे ठसे न उमटल्याने अनेक अडचणींचा सामना करायला लागू शकतो. यामध्ये नोकरी मिळण्यास, दुसऱ्या देशात जाण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
अॅडरमेटोग्लिफिया असं या आजाराचे नाव आहे. हा एक दुर्मिळ अनुवांशिक रोग आहे. ज्यामध्ये बोटांवर असणाऱ्या बारीक रेषा नष्ट होतात. हा आजार प्रमाण वाढू लागल्यानंतर वैज्ञानिकांनी देखील यावर संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. अॅडरमेटोग्लिफिया हा आजार २००७मध्ये समोर आला होता. परदेशी वंशाची एक महिला अमेरिकेत येण्याचा प्रयत्न करीत होती. तिचा चेहरा पासपोर्टच्या चेहऱ्याशी जुळत होता. मात्र सदर महिलेचे बोटांचे ठसे उमटत नव्हते. त्यामुळे विमानतळावर तपासणीसाठी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली.
बांगलादेशातही अशीच एक घटना समोर आली, पण ती एक-दोन लोकांची नाही तर संपूर्ण कुटुंबाची होती. राष्ट्रीय ओळखपत्र बनवण्यासाठी एका कुटुंबियाने सरकारी कार्यालय गाठले तेव्हा अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कोणाचेही बोटांचे ठसे उमटत नव्हते. अनेक दिवस प्रयत्न केले. मात्र त्यांच्या बोटांचे ठसे उमटलेच नाही. त्यानंतर त्यांचे ओळखपत्र जारी करण्यात आले, परंतु त्यात त्यांच्या बोटांचे ठसे नसल्याचे नमूद करण्यात आले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"