ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ८ - रिपब्लिकन पक्षाचे नेते व अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेतील उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी ' अमेरिकेत मुस्लिमांना प्रवेशबंदी असायला हवी' असे वक्तव्य केले आहे. मुस्लिमांचा अमेरिकेतील प्रवेश संपूर्णपणे रोखावा, असेही ते म्हणाले. कॅलिफोर्निया येथे गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १४ जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रंप यांनी हे वक्तव्य केले आहे.
अमेरिकेविषयी मुस्लिमांमध्ये प्रचंड नाराजी आहे, ती कायम असतानाच त्यांना देशात प्रवेश देण्यात आल्यास ते अमेरिकेतील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करण्यासारखेच आहे. त्यामुळे अमेरिकेत संकटाची परिस्थिती निर्माण करण्यापेक्षा मुस्लिमांना प्रवेशबंदी करणे योग्य ठरेल, असे ते म्हणाले.
दरम्यान ट्रंप यांच्या या वक्तव्यावर अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी टीका केली आहे. कोणत्याही समाजाला देशात प्रवेशबंदी करणे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कॅलिफॉर्नियातील सॅन बॅर्नार्डिनोमध्ये एक महिला व एका पुरूष दहशतवाद्याने अंदाधुंद गोळीबार करून १४ जणांना ठार मारले होते. त्यानंतर अनेक वेळा मुस्लिम समुदायाला लक्ष्य करून राजकीय शेरेबाजी करण्यात आली.