ऑनलाइन लोकमत -
लंडन, दि. १० - आयसीसमध्ये (इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सीरिया लिव्हेण्ट) जिहादी बनण्याच्या उद्देशानं भरती होण्याआधी प्रवेश परिक्षा घेतली जाते. या प्रवेश परिक्षेत 23 प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची यादी लिक झाली आहे. यामध्ये जन्मतारीख, रक्तगट, राष्ट्रीयत्व तसंच मागील जिहादी अनुभवावर प्रश्न विचारले जातात.
यातील काही फॉर्म स्काय न्यूजच्या हाती लागले आहेत. ज्यामधून 51 देशांतील 22 हजार लोकांची नावे समोर आली आहेत, ज्यांनी आयसीसमध्ये भर्ती होण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती या संघटनेला दिली आहे. 23 प्रश्न असलेली ही प्रश्नपत्रिका याअगोदरही एका वेबसाईटने ऑनलाइन टाकली होती. ज्यामधून 40 देशातील 1,736 जणांची माहिती समोर आली होती. ही कागदपत्र अरबी भाषेत होती ज्यावर इस्लामिक स्टेटचा स्टॅम्पदेखील होता.
या फॉर्ममध्ये स्वताच्या नावाव्यतिरिक्त आईचं नाव आणि त्यांच्या आवडत्या लढवय्याचे नावदेखील विचारले आहे. तसंच शिक्षण, शरियाबद्दल माहिती आणि याअगोदर कधी लढला आहात का ? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. काहीजणांनी आपल्याकडे असणा-या विशेष कौशल्याचीदेखील या फॉर्ममध्ये माहिती दिली आहे. या फॉर्ममध्ये तुम्हाला कोणती भुमिका हवी आहे ? असा प्रश्नदेखील विचारण्यात आला आहे, त्या उत्तरानुसार निवड केली जाते. आणि त्यावरुनच आत्मघाती हल्लेखोर, सैनिक अशा भुमिका दिल्या जातात.
यामध्ये तुम्ही किती आज्ञाधारक आहात हेदेखील पाहिलं जातं. तुम्हा कोणत्या तारखेला आणि कुठे मृत्यू हवा आहे ? याची माहितीदेखील विचारली जाते. एकदा निवड झाली की जगभरात असणा-या जिहादींची माहिती नव्याने भर्ती होणा-यांना दिली जाते.