ऑनलाइन लोकमत
अमृतसर, दि. २ - अदनान सामीला भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं, परंतु पाकिस्तानातून आलेल्या शेकडो हिंदूंसह अहमदी पंथाच्या अनेक पाकिस्तानी नागरिकांना जवळपास २० ते २५ वर्षे भारतात येऊनही नागरिकत्व मिळालेले नाही. यामुळे अदनान सामीला VIP वागणूक मिळाल्याची व गरीबांना कुणी वाली नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार जालंधर व पठाणकोटमध्ये पाकिस्तानातून अनेक वर्षांपूर्वी आलेले सुमारे ३०० हिंदू राहतात. त्यांचे नागरिकत्वाचे अर्ज सरकार दरबारी नुसतेच पडून आहेत आणि प्रक्रिया सुरू आहे खास सरकारी ठेवणीचे उत्तर त्यांना ऐकवले जाते. तर कादियान समजाच्या पाकिस्तानातल्या मुलींनी भारतात लग्न केली आहेत, त्यांना मुलंही आहेत, परंतु त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेले नाही.
माझं २००३ मध्ये भारतातल्या नागरिकाशी लग्न झालं, परंतु अदनानवर प्रेमाचा वर्षाव करणा-या भारत सरकारनं दशकभरात मला मात्र नागरिकत्व का दिलं नाही असा प्रश्न ताहिरा झहूर या महिलेनं विचारला आहे. अहमदिया पंथीयांचं कादियान या भारतातलं मुख्यालय आहे. दोन्ही देशात या पंथाचे लोक असून लग्नामुळे त्यांच्यात देशांतर घडतं.
माझ्या अर्जाचं नक्की काय झालंय हेच कळायला मार्ग नसल्याची व्यथा ताहिरानं मांडली आहे. कदाचित मी बॉलीवूडमधली सेलिब्रिटी नसल्यामुळं माझ्या अर्जाला किंमत नसावी असंही तिनं म्हटलं आहे.
पंजाबमध्ये पाकिस्तानातून आलेल्या ३००च्या वर हिंदूंची गतही वेगळी नाही. अनेकांचे पाकिस्तानी पासपोर्ट संपलेले आहेत, आणि व्हिसाची मुदत केवळ वाढवली जाते. अदनान सामीवर कृपादृष्टी केलेले भारत सरकार आमच्यावर कधी मेहेरबान होणार असा प्रश्न हे स्थलांतरीत विचारत आहेत.