संयुक्त राष्ट्रे : पॅलेस्टाइनला संयुक्त राष्ट्रांचा कायमस्वरुपी सदस्य बनविण्याचा प्रस्ताव त्या संघटनेच्या आमसभेत शुक्रवारी मंजूर झाल्यामुळे इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन हे संतप्त झाले. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान संयुक्त राष्ट्रांचा जाहिरनामा फाडला. पॅलेस्टाइनसंदर्भातील प्रस्तावाला भारतासह १४३ देशांनी पाठिंबा दिला तर अमेरिका, इस्रायलसह ९ देशांनी विरोध केला तर २५ देश तटस्थ राहिले. मात्र हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मंजूर झाला तरच तो अमलात आणणे शक्य होणार आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला पॅलेस्टाईनला कायमस्वरुपी सदस्यत्व द्यायचे अधिकार नसून ते फक्त त्या देशाला काही विशेष अधिकार प्रदान करू शकतात. पॅलेस्टाइनला कायमस्वरुपी सदस्यत्व द्यावे हा मंजूर केलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसमोर मांडला जाईल. तिथे तो मंजूर झाल्यासच पॅलेस्टाइनला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळू शकते.
तेव्हा व्हेटोमुळे फेटाळला प्रस्ताव
याआधीही असा प्रस्ताव मंजूर होऊन तो संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीकडे गेला होता. त्यावेळी त्या समितीत १२ देशांनी प्रस्तावाला पाठिंबा दिला पण अमेरिकेच्या नकाराधिकारामुळे (व्हेटो) तो प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. या जुन्या निर्णयावर संयुक्त राष्ट्रांच्या समितीने फेरविचार करावा अशी सूचना संयुक्त राष्ट्रांनी केली आहे.
आधुनिक नाझींसाठी दरवाजे खुले केले : इस्रायल
पॅलेस्टाइनला संयुक्त राष्ट्रांचे कायमस्वरुपी सदस्यत्व द्यावे असा प्रस्ताव संमत मांडणे व तो आमसभेत संमत करणे हा संयुक्त राष्ट्रांच्या जाहिरनाम्याचा भंग आहे अशी टीका इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांनी केली. संयुक्त राष्ट्रांनी आधुनिक नाझींसाठी दरवाजे खुले केले आहेत असेही ते म्हणाले व भाषणादरम्यान संयुक्त राष्ट्रांचा जाहीरनामा फाडला.