ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ४ - श्रीलंकन क्रिकेटपटू तिलकरत्न दिलशान याला 'धर्म परिवर्तन' करण्यास सांगण्यावरून पाकिस्तानचा क्रिकेटर अहमद शहजाद वादात सापडला आहे.
शनिवारी श्रीलंका- पाकिस्तानदरम्यान डम्बुला येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये परत जात असताना शहजाद व दिलशान यांच्यात बोलणे सुरू होते. त्यावेळी शहजादने दिलशानला धर्मपरिवर्तन करून मुस्लीम बनण्याचा सल्ला दिल्याचे कॅमे-यात कैद झाले आहे. ' जर तू मुस्लीम नसशील आणि धर्मपरिवर्तन करून मुस्लिम बनलास तर तू आयुष्यात काहीही केलस तरी तू थेट स्वर्गात जाशील' असे शहजाद दिलशान सांगत असल्याचे दिसत आहे. यावर दिलशानने दिलेले उत्तर स्पष्ट ऐकू आले नसले तरी त्यानंतर शहजाद त्याला ' मग परिणामांसाठी तयार रहा' असे उत्तर देताना दिसला आहे
याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) मुख्यालयाने शहजादला समन्स बजावत चौकशी सुरू केली आहे.
तिलकरत्न दिलशान याचे वडील मुस्लीम असून आई बौद्ध आहे. त्याचे मूळ नाव तुवान मोहम्मद दिलशान असे होते, मात्र १९९९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिलशानने त्याचे नाव तिलकरत्ने मुदियानसेलगे दिलशान असे केले.
दिलशानचे लहानपणापासूनचे प्रशिक्षक राजन परानवितना यांच्या सांगण्यानुसार, दिलशान जरी मुस्लिम नाव लावत असला तरीही त्याने व त्याच्या भावंडांनी लहानपणापासूनच त्यांच्या आईच्या धर्माचे पालन केले होते.