काबूल : अफगाणिस्तानात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दोन प्रतिस्पध्र्यानी एका करारावर स्वाक्षरी करत राष्ट्रीय एकता सरकार स्थापन करण्याबाबत सहमती दर्शविली. हा पेच सोडवण्यासाठी येथे आलेले अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरींनी कराराचे स्वागत केले.
अब्दुल्ला अब्दुल्ला व अशरफ गणी यांच्यातील हा करार म्हणजे अफगाणला राजकीय संकटातून बाहेर काढण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल असल्याचे केरी म्हणाले. दरम्यान, दोन्ही उमेदवारांनी 15 जून रोजी झालेल्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. ‘आज मी, माझी टीम आणि डॉक्टर गणी व त्यांचे सहकारी यांनी देशातील राष्ट्रीय एकोप्यासाठी व अफगाणच्या उज्जवल भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे,’ अशी प्रतिक्रिया अब्दुल्ला यांनी व्यक्त केली. गतकाळात दोघांमध्ये अनेकवेळा शाब्दिक चकमकी उडाल्या. आता सर्वाचे लक्ष त्यांचे सर्वच समर्थक या कराराचा स्वीकार करतात किंवा नाही याकडे आहे. (वृत्तसंस्था)