कुंदूज : तालिबान बंडखोरांनी ताब्यात घेतलेल्या कुंदूज शहरावर पुन्हा ताबा मिळविण्यासाठी अफगाण सैनिकांनी मोठा हल्ला चढविला असून अमेरिकेचे हवाईदल बॉम्बफेक करून मदत करीत आहे.उत्तर अफगाणिस्तानातील या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरातून २००१ साली तालिबानला हाकलण्यात आले होते. त्यानंतर १५ वर्षांनंतर कुंदूजवर तालिबानने ताबा मिळविला आहे.या शहरावर सोमवारी तालिबानने कब्जा करून सर्व शासकीय इमारतींवर ताबा मिळविला होता. त्याचबरोबर सर्वत्र आपले ध्वज फडकावून शेकडो कैद्यांना मुक्त केले होते. या शहरात आता तुफान गोळीबार ऐकू येत असून अफगाण सैनिकांनी विमानतळाच्या बाहेरील भागावर पुन्हा ताबा मिळविला आहे. ही कारवाई करताना अमेरिकी हवाई दलाने तेथे हवाई हल्ला केला, असे ‘नाटो’च्या एका पत्रकात म्हटले आहे. अफगाण सैनिकांनी हल्ला करूनही तालिबान बंडखोरांनी पोलिसांची आणि रेडक्रॉसची वाहने चोरली. कुंदूजमधील पोलीस मुख्यालय आणि कारागृहावर पुन्हा ताबा मिळविल्याचा दावा संरक्षण मंत्रालयाने केला असला तरीही २०० खाटांचे शासकीय रुग्णालय आणि अन्य कित्येक सरकारी इमारतींवर अजूनही तालिबानचा ताबा आहे.(वृत्तसंस्था)
कुंदूजसाठी अफगाण सैन्याचा मोठा हल्ला
By admin | Published: September 29, 2015 11:04 PM