बीजिंग : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यानच्या समर्पित कार्गो एअर कॉरिडॉरमुळे चिनी माध्यमांचे पित्त खवळले आहे. पाकव्याप्त काश्मिरातून जाणाऱ्या चीनच्या महत्त्वाकांक्षी आर्थिक कॉरिडॉरला प्रत्युत्तर देण्याचा हा प्रयत्न असून, यातून भारताच्या भू-राजकीय विचारांतील अडेलतट्टूपणा प्रतिबिंबित होता, असे चीनचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी भारत आणि अफगाणिस्तानने गेल्या आठवड्यात समर्पित हवाई कॉरिडॉर सुरू केला होता. या कॉरिडॉरमुळे चोहीबाजूने जमीन असलेल्या अफगाणिस्तानला भारतीय बाजारपेठेत व्यापक प्रवेशाची संधी मिळणार आहे. भारत पर्यायी आणि विश्वसनीय दळणवळण मार्ग तयार करण्यासाठी अफगाणिस्तानसोबत काम करीत आहे. भारत, अफगाणिस्तान आणि इराणदरम्यान आधीच सुरू झालेल्या आणि प्रस्तावित मार्गांमुळे भारत अफगाणिस्तान आणि इतर मध्य आशियाई देशांसोबत व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी पाकिस्तानकडे दुर्लक्ष करील काय, असा प्रश्न उपस्थित होतो, असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरला भारताने दर्शविलेल्या विरोधाचा संदर्भ देताना या लेखात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या सर्व दळणवळण प्रयत्नांमुळे प्रादेशिक विकासात अधिक सक्रियतेने सहभागी होण्याची भारताची इच्छा दिसून येते; मात्र त्याचबरोबर यातून त्याच्या भू-राजकीय विचारातील अडेलतट्टूपणाही दिसतो, असे या लेखात नमूद केले आहे. भारताने नेहमीच चीनच्या ‘बेल्ट अॅण्ड रोड’ला विरोध केला आहे. त्यामुळे स्वत:चे संपर्क जाळे बनविण्याचे त्याचे प्रयत्न चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरला शह देण्याची एक व्यूहरचना दिसते, असेही या दैनिकाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
अफगाण कॉरिडॉरमुळे ड्रॅगनचे पित्त खवळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 12:34 AM