इस्लामाबाद : अफगाण सरकार व तालिबानदरम्यान पाकिस्तानात पहिली औपचारिक शांतता चर्चा झाली. देशातील १३ वर्षे जुन्या यादवीवर तोडगा काढण्यासाठी रमजाननंतर पुन्हा चर्चा करण्याचा निर्णय उभय पक्षांनी यावेळी घेतला. यजमान पाकने या बैठकीला ‘मोठे यश’ असे संबोधले आहे. येथून जवळच असलेल्या मुरी येथे ही चर्चा झाली. अफगाण उच्च शांतता परिषदेच्या शिष्टमंडळाने तालिबान नेत्यांची भेट घेतली तेव्हा अमेरिका आणि चीनचे प्रतिनिधीही उपस्थित होते. पाकने अफगाण सरकार आणि तालिबानच्या प्रतिनिधींमध्ये मंगळवारी मुरी येथे बैठक घडवून आणली. चीन, अमेरिकेचे प्रतिनिधीही या बैठकीला हजर होते, असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. अफगाण व तालिबानदरम्यानच्या शांतता प्रक्रियेविषयी अशा प्रकारची घोषणा केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. बैठकीत सहभागी झालेल्यांनी अफगाणिस्तानात शांतता व सलोखा निर्माण करण्यासाठीचे उपाय, मार्ग याबाबत विचारांची देवाण-घेवाण केली. अफगाणिस्तानातील चिरस्थायी शांततेसाठी प्रत्येक पक्ष या प्रक्रियेशी प्रामाणिकतेने न बांधिलकीने एकरूप होईल, असे यावेळी मान्य करण्यात आले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या चर्चेला कोंडी फोडणारी प्रक्रिया, असे संबोधून शांतता चर्चा उधळून लावण्याच्या प्रयत्नांबाबत सावधगिरीचा इशाराही दिला. ‘यातून सकारात्मक निष्पत्ती होईल जी निश्चितपणे अफगाणिस्तानचे स्थैर्य आणि शांततेसाठी खूप उपयुक्त ठरेल, असे शरीफ यांनी ओस्लो येथे पाकिस्तानी टीव्ही चॅनलशी बोलताना सांगितले. शरीफ सध्या नॉर्वेत आहेत. शरीफ पुढे म्हणाले की, ही प्रक्रिया फिसकटणार नाही याची आम्ही सर्वांनीच खबरदारी घ्यायला हवी. कारण, ही जबाबदारी केवळ अफगाणिस्तान, पाकिस्तान व इतर पक्षांची नाही, तर ती आंतरराष्ट्रीय समुदायाचीदेखील आहे. (वृत्तसंस्था)
अफगाण सरकार, तालिबानची पाकिस्तानात ऐतिहासिक चर्चा
By admin | Published: July 08, 2015 11:49 PM