अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूल ताब्यात घेऊन बरेच दिवस झालेले आहेत. तालिबानचे (Taliban) सरकारही स्थापन झाले आहे. यामुळे जगासमोर स्वच्छ चेहरा ठेवण्यासाठी तालिबानने मोठा निर्णय घेतला आहे. अफगाण पोलिसांच्या ताब्यात काबूल देण्यात येणार असून तालिबानी दहशतवाद्यांना दुसऱ्या प्रांतात हलविले जाणार आहे. (Afghan police to take control of Kabul soon.)
काबूलमध्ये यापुढे वर्दीतील पोलीस दिसणार आहेत. हे पोलीस तेच असतील जे गेल्या सरकारच्या काळात नियुक्त होते. मात्र, या पोलिसांचा आणि तालिबानी दहशतवाद्यांचा गणवेश एकसारखाच असणार आहे. तालिबानचा सांस्कृतिक आयोगाचा सदस्य अनाममुल्लाह समनगनी याने ही माहिती दिली आहे. सध्या तालिबानी दहशतवाद्यांकडे वर्दी नाहीय. त्यांना अणगाणिस्तानच्या विविध मिलिट्री पोस्टवर पाठविले जाणार आहे. मात्र, त्यांनी किती दहशतवाद्यांना आणि पोलिसांना तैनात केले जाणार याची माहिती दिलेली नाही.
समनगनी यांनी सांगितले की, पोलीस आणि सैन्यातील ज्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रशिक्षण घेतले आहे, त्यांच्यावर काबूलच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. यानंतर जे मुजाहिदीन वेगवेगळ्या पोलीस विभागांत सध्या तैनात आहेत आणि ज्यांच्याकडे वर्दी नाहीय त्यांना प्रांतांच्या पोलीस मुख्यालये आणि लष्करात पाठविण्यात येणार आहे.
तालिबानने लोकांची मागणी स्वीकारली...काबूलच्या नागरिकांनी तालिबानकडे वर्दीतील पोलीस शहराच्या सुरक्षेसाठी तैनात करावेत अशी मागणी केली होती. यामुळे तालिबानी सांगून होणारी गुन्हेगारी थांबविता येईल. लोकांना वर्दीतील पोलिसांची सवय आहे, त्यांच्या उपस्थितीत लोक अधिक सुरक्षित असल्याचे जाणवते. यामुळे तालिबानने हा निर्णय घेतला आहे.