काबूल : अफगाण राष्ट्राध्यक्षपदासाठी गेल्या महिन्यात झालेल्या दुसऱ्या फेरीतील निकालावरून निर्माण झालेल्या पेचावर तोडगा काढण्यात अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांना यश आले आहे. निवडणूक रिंगणातील दोन्ही उमेदवारांनी फेरमतमोजणीस सहमती दर्शवल्याने राजकीय पेचावर तात्पुरता तोडगा निघाला आहे.माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला अब्दुल्ला व माजी अर्थमंत्री अशरफ गणी यांच्या मतैक्य घडविण्यात केरी यांना शनिवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करावे लागले. दोन्ही उमेदवारांच्या उपस्थितीत केरी यांनी जाहीर केल्यानुसार, आठ दशलक्ष मतांची फेर मतमोजणी २४ तासांत केली जाईल. १४ जून रोजी झालेल्या दुसऱ्या फेरीतील मतदानात गणी यांनी ५६.४४ टक्के, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अब्दुल्ला यांना ४३.४५ टक्के मते मिळाली होती. एप्रिलमध्ये झालेल्या पहिल्या फेरीतील निकालापेक्षा हा निकाल भिन्न आल्याने देशात मोठा राजकीय पेच उद्भवला होता. अब्दुल्ला यांनी मतमोजणीत अफरातफर झाल्याचा आरोप करत स्वत:च खरे विजयाचे शिलेदार असल्याचा दावा केला होता.अब्दुल्ला यांनी ‘तांत्रिक आणि राजकीय सहमती’ अशा शब्दांत या संपूर्ण घडामोडींचे वर्णन केले, तर गणी यांनी निवडणुकीच्या इतिहासातील सर्वांत मोठे सर्वसमावेशक आॅडिट असे यास संबोधले.काळजीस कारण की...आंतरराष्ट्रीय सुरक्षा व सहकार्य दलाच्या मदतीने मतपत्रिका काबूल येथे आणण्यात येतील. आगामी काळ खूप कठीण असून, काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. अब्दुल्ला हे ‘समांतर सरकार’ चालवण्याच्या तयारीत असल्याची अमेरिकेला कुणकुण लागल्याने ते अफगाणमधील या संपूर्ण घटनाक्रमावरून चिंतेत आहेत. (वृत्तसंस्था)
अफगाण पेचावर अमेरिकी तोडगा
By admin | Published: July 14, 2014 12:10 AM