ऑनलाइन लोकमत
कंधार, दि. 23 - अफगाणिस्तान लष्कराच्या तळावर तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 11 सैनिक ठार झाले आहेत. हल्ल्यात इतरही 10 सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. कंधारमधल्या शाह वली कोट जिल्ह्यात हा हल्ला करण्यात आला आहे. या आधीही बलुचिस्तानच्या चमन भागात गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी पाकिस्तानी सैनिकांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात 50 अफगाणी सैनिक ठार झाले होते. तर 100 हून अधिक जखमी होते. अफगाणिस्तानच्या सेनेनं बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांवर गोळीबार केला होता. यावेळी एका महिलेसमवेत 3 जणांचा मृत्यू झाला होता. तर 17 लोक जखमी होते. अफगाणी सैन्यानं चमन जिल्ह्यातील कली लुकमान आणि कली जहांगीर या भागातील सैनिकांना लक्ष्य केलं होतं. अफगाणिस्तानला ऑपरेशनअंतर्गत पाकिस्तानच्या दोन पोस्ट नेस्तनाबूत करायच्या आहेत. तर गेल्याच महिन्यात उत्तर अफगाणिस्तानच्या एका सैन्य तळावर तालिबानींनी केलेल्या हल्ल्यात किमान 141 अधिक अफगाणी सैनिक ठार झाले होते. या हल्ल्याने देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
मजार-ए-शरीफ शहराच्या जवळ झालेल्या हल्ल्यात किती नुकसान झाले याची माहिती मात्र मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली नव्हती. काही तास चाललेल्या या हल्ल्यात मशिद आणि भोजनालयातील सैनिकांना लक्ष्य करण्यात आले होते. तालिबानच्या दोन हल्लेखोरांनी स्वत:ला उडवून देत मोठा हल्ला घडवून आणला होता. हे हल्लेखोर अफगाणी सैन्याच्या पोशाखात वाहनांमधून आले होते. या हल्ल्यानंतर किती हल्लेखोरांना ठार मारण्यात आले, याची माहिती न देता संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते की, अफगाणी सैन्याने सर्व हल्लेखोरांना मारले असून, एका हल्लेखोराला पकडण्यात अफगाणी सैन्याला यश आले होते.
दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करा, असा इशाराच भारतानं पाकिस्तानला दिला होता. अफगाणिस्तानातील हल्ल्याचा भारताने स्पष्ट शब्दांत निषेध केला होता. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अफगाणिस्तानला सर्वोतोपरी मदत देण्याची भारताची तयारी आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.