काबूल : अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिका प्रांतात बुधवारी पहाटे जोरदार भूकंप झाला. रिश्टर स्केलवर ६.१ अशी नोंद झालेल्या या प्रलयंकारी भूकंपात एक हजारांहून अधिक अफगाणी नागरिक मृत्यूमुखी पडले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली अवघ्या दहा किमी अंतरावर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अफगाणिस्तानातील हा गेल्या दोन दशकांतील सर्वात विध्वंसक भूकंप आहे. पाकिस्तानी सीमेला लागून असलेला पक्तिका प्रांत पहाडी प्रदेश आहे. या भागातील खोस्त शहरापासून ५० किमी अंतरावर नैऋत्येला भूकंपाचा केंद्रबिंदू होता. पक्तिका प्रांतात बहुतांश घरे दगड-विटांचे आहेत. त्यामुळे भूकंपाचा धक्का बसताच अनेक घरे जमीनदोस्त झाली. मातीच्या ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकले असल्याची भीती आहे. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.
पाकिस्तान आणि भारतातही जाणवले भूकंपाचे हादरे भूकंपाचे वृत्त समजताच तालिबानी सरकारने आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर पाठवली. मात्र, मदत अपूर्ण पडत असल्याचे चित्र आहे. अनेक जण मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली. युरोपियन भूगर्भशास्त्र संस्थेनुसार भूकंपाचे हादरे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतातही जाणवले.
भारत मदत देण्यास कटिबद्ध...अफगाणिस्तानातील भूकंपात मोठ्या प्रमाणावर झालेल्या जीवितहानीबद्दल भारताने दु:ख व्यक्त केले. संकटाच्या या काळात अफगाणिस्तानच्या लोकांंना मदत देण्याप्रति भारताने कटिबद्धता व्यक्त केली. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले की, अफगाणिस्तामधील विध्वंसक भूकंपग्रस्तांच्या दु:खात भारत सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो.
यापूर्वीही झाले होते भयावह भूकंपnअफगाणिस्ताचा ईशान्य भाग आणि उत्तर पाकिस्तान येथे २०१५ मध्ये झालेल्या भूकंपात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. n१९९८ मध्ये अफगाणिस्तानच्या ईशान्य भागात झालेल्या ६.१ तीव्रतेच्या भूकंपात ४,५०० जण मृत्यूमुखी पडले होते.