काबुल - अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर संपूर्ण अफगाणिस्तान सहजपणे ताब्यात घेणाऱ्या तालिबानला पंजशीर प्रांतात मात्र कडवी टक्कर मिळत आहे. (Afghanistan Crisis) पंजशीरमध्ये तालिबानविरोधातील योध्यांचे नेतृत्व करत असलेल्या अहमद मसूद यांचे योद्धे युद्धासाठी सज्ज आहेत. नँशनल रेजिस्टेंट फ्रंट म्हणजेच नॉर्दन अलायन्सचे नेतृत्व करत असलेल्या अहमद मसूद यांनी तालिबानला आव्हान दिले आहे. (Ahmed Masood's direct challenge to Taliban after killing 300 Talibani terrorists in Panjshir)
अहमद मसूद म्हणाले की, आम्ही युद्धाची तयारी केली आहे. मात्र यामधून तोडगा काढण्यासाठी तालिबानसोबत चर्चा झाली तर आम्ही चर्चेसाठीही तयार आहोत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांना जोरदार टक्कर देत असलेल्या अहमद मसूद यांनी ही घोषणा अशावेळी केली आहे की, ज्यावेळी तालिबानने त्यांच्या हजारो दहशतवाद्यांना पंजशीरमध्ये पाठवले आहे. दरम्यान, मसूद यांनी ३०० तालिबानी दहशतवाद्यांना मारल्याचा तसेच अनेकांना बंदी बनवल्याचा दावा केला आहे.
पंजशीरचे सिंह म्हणून ओळखले जाणाऱ्या अहमद शाह मसूद यांचे पुत्र असलेल्या अहमद मसूद यांनी रॉयटर्ससोबत फोनवरून बोलताना सांगितले की, आम्ही तालिबानला जाणीव करून देऊ इच्छा की, पुढे जाण्यासाठीचा एकमेव मार्ग हा चर्चा हा आहे. युद्ध सुरू व्हावे, अशी आमची इच्छा नाही. तालिबानला आव्हान देण्यासाठी अहमद मसूद यांनी आपले सैन्य उभे केले आहे. हे सैन्य अफगाण सैन्य, स्पेशल फोर्सेस आणि स्थानिक योध्यांची मिळून बनली आहे.
दरम्यान, बंडखोरी मोडून काढण्यासाठी हजारो योध्यांना पंजशीरमध्ये पाठवण्यात आल्याचे तालिबानने सांगितले आहे. तालिबानने ट्विटर वरून सांगितले की, स्थानिक अधिकाऱ्यांनी शांततापूर्ण मार्गाने पंजशीर आमच्या ताब्यात देण्यास नकार दिला. त्यामुळे तेथील भागात नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही योद्धे पाठवले आहेत. तालिबानचे समर्थक असलेल्या एका अकाऊंटवरून या संदर्भातील एक व्हिडिओसुद्धा शेअर करण्यात आला आहे.