Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील काबुल विमानतळावरुन जवळपास १५० भारतीय नागरिकांचं तालिबान्यांनी अपहरण केल्याचं वृत्त अफगाणिस्तानातील माध्यमांमध्ये प्रसारित केलं जात होतं. पण तालिबानकडून तातडीनं याबाबत खुलासा करण्यात आला असून सर्व भारतीय सुखरुप असल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यानं दिली आहे. त्यामुळे मोठा दिलासा भारताला मिळाला आहे.
अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर शेकडो भारतीय नागरिक मायदेशी परतण्यासाठी वाट पाहात होते. पण त्यांना तालिबान्यांनी विमानतळाबाहेर नेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याचं वृत्त अफगाण माध्यमांमध्ये प्रासरित केलं जात होतं. यावर तालिबानचा प्रवक्ता अहमदुल्ला वसेक यानं अधिकृतरित्या समोर येत भारतीय नागरिकांचं अपहरण करण्यात आलेलं नाही आणि सर्व नागरिक सुखरूप असल्याचं स्पष्ट केलं आहे.
काबुलमधील सर्व भारतीय नागरिक सुखरुप असून त्यांच्या सुरक्षेसाठीच त्यांना विमानतळाजवळील एका गॅरेजमध्ये हलविण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. याच ठिकाणी त्यांची सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत असून त्यांच्या मायदेशात परतण्यासाठीची पुढची प्रक्रिया सुरू आहे, असं वृत्त आता अफगाण माध्यमांमध्ये प्रसारित केलं जात आहे.