काबुल: अफगाणिस्तानवरतालिबाननं कब्जा केला असून देशात अराजक माजलं आहे. तालिबानी दहशतवाद्यांच्या भीतीनं नागरिक देश सोडून जात आहेत. मिळेल त्या मार्गानं देशाबाहेर पडण्याचे प्रयत्न लोकांकडून सुरू आहेत. दोनच दिवसांपूर्वी काबुल विमानतळावरून उड्डाण घेत असलेल्या विमानाला लटकून देश सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांचा मृत्यू झाला. विमान हवेत झेपावल्यानंतर काही मिनिटांतच तिघेजण खाली कोसळले आणि त्यांचा अंत झाला.
१६ ऑगस्टला अमेरिकन हवाई दलाचं विमान काबुलमधून उड्डाण करत होते. विमानाचं दार उघडताच अफगाणी नागरिकांचा लोंढा आत शिरला. त्यांना देश सोडायचा होता. १३४ प्रवासी क्षमता असलेल्या विमानात जवळपास ८०० जण शिरले. विमानात जागा न मिळालेले काही जण लटकून प्रवास करत होते. अशा तिघांचा कोसळून मृत्यू झाला. त्यांच्यापैकी एका तरुणाच्या कुटुंबानं आपली व्यथा मांडली आहे. तरुणाचा मृतदेह हाती लागला, तेव्हा त्याची अवस्था कशी होती, याबद्दलची अंगावर काटा आणणारी आपबिती त्यांनी सांगितली.
आकाशात झेपावलेल्या विमानातून तीन जण खाली पडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात १७ वर्षांचा रेझादेखील (नाव बदलण्यात आलंय) होता. रेझाचा मृतदेह हाती लागला, त्यावेळी त्याचे हात-पाय गायब होते, असं रेझाच्या नातेवाईकांनी सांगितलं. रेझाच्या कुटुंबीयांनी त्याला फोन केला. तो एका अज्ञात व्यक्तीनं उचलला. त्याचवेळी कुटुंबीयांना काहीतरी अघटित घडल्याची चाहूल लागली.
रेझासोबत त्याचा भाऊदेखील काबुल विमानतळावर गेला होता. अफगाणिस्तान सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेण्यासाठी त्यांनी विमानतळ गाठलं होतं. रेझाच्या कुटुंबीयांना त्याचा मृतदेह सापडला आहे. 'आम्ही आमच्या कुटुंबातील जोन सदस्य गमावले होते. एकाचा मृतदेह मिळाला आहे. दुसऱ्याचा मृतदेह अद्याप सापडलेलं नाही. आम्ही अनेक रुग्णालयांमध्ये गेलो. पण अद्याप तरी कोणतीही माहिती मिळालेली नाही,' अशा शब्दांत रेझाच्या कुटुंबीयांनी त्यांची व्यथा मांडली.