इस्लामाबाद - अफगाणिस्तानमध्येतालिबानची सत्ता आल्यापासून पाकिस्ताननेतालिबान्यांना पंखाखाली घेऊन त्यांचा बचाव करण्यास सुरुवात केली आहे. (Afghanistan Crisis Update) आतातर तालिबानला मान्यता देण्यावरून पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी पाश्चात्य देशांना थेट इशारावजा धमकी दिली आहे. तालिबानला मान्यता न दिल्यास ९/११ सारख्या हल्ल्याचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा युसूफ यांनी पाश्चात्य देशांना दिला आहे. ( Recognize Taliban otherwise 9/11-like attack could happen, Pakistani NSA warns Western countries)
युसूफ म्हणाले की, अफगाणिस्तानला दुसऱ्यांदा जगापासून वेगळे सोडले तर पाश्चात्य देशांसमोर निर्वासितांचा व्यापक प्रश्न निर्माण होईल. १९८९ मध्ये जेव्हा सोव्हिएट युनियनचे सैन्य या भागातून माघारी गेले होते, तेव्हा पाश्चात्य देशांनी अफगाणिस्तापासून अंतर ठेवले होते. तसेच अफगाणिस्तानला दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनू दिले. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने आतापर्यंत तालिबानला मान्यता दिलेली नाही. मात्र जागतिक समुदायाला विनंती आहे की, त्यांनी तालिबानसोबत चर्चा करावी, ज्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने पोकळी निर्माण होणार नाही.
डॉक्टर युसूफ यांनी सांगितले की, आता जगासमोर ती वेळ आली आहे जेव्हा तालिबानचं ऐकलं पाहिजे, तसेच आधीच्या चुकांपासून वाचलं पाहिले. मोईद म्हणाले की, अफगाणिस्तानमध्ये जर पैसे नसतील, तिथे प्रशसन नसेल आणि आयएसआयए आणि अल कायदासारखे गट तिथे आपली पाळेमुळे रोवत असतील तर काय होऊ शकते, याचा विचार झाला पाहिजे. तसेच येथे निर्माण होणारे निर्वासितांचे संकट केवळ या भागापुरते मर्यादित राहणार नाही.
या संकटामुळे निर्वासितांचा लोंढा वाढेल, दहशतवाद वाढेल. असे पुन्हा व्हावे, असे कुणालाही वाटणार नाही. अफगाणिस्तानला एकटे सोडल्यामुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. तिथे जे आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहेत. ते दहशतवादाचा मार्ग अवलंबू शकतात. तिथे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते आणि त्याची परिणती म्हणून अखेरीस ९/११ सारखा हल्ल्यामध्ये होऊ शकते.
मोईद यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा पाकिस्तान सरकार तालिबानला वेगळे टाकण्याऐवजी त्यांच्यासोबत मिळून करण्यासाठी आग्रह करत आहे. तालिबान सुरक्षा पुरवू शकते, असे इम्रान खान सरकारचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार यावे, यासाठी पाकिस्तानने आपली शक्ती पणाला लावली होती.