काबुल: दहशतवादी संघटना तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानाततालिबानची सत्ता आल्यापासून जनतेत प्रचंड दहशत आहे. लाखो लोकांना देश सोडायचा आहे. तालिबाननं अफगाणी नागरिकांना सुरक्षेचं वचन दिलं आहे. मात्र नागरिकांचा त्यांच्या शब्दावर विश्वास नाही. कोणत्याही मार्गानं देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न नागरिकांकडून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर तालिबाननं दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
अफगाणिस्तानात लोकशाही नसेल. देशात शरिया कायदा लागू राहील, या दोन महत्त्वाच्या घोषणा तालिबाननं केल्या आहेत. 'देशात कोणतीही लोकशाही व्यवस्था लागू होणार नाही. कारण आपल्या देशात याला कोणताही आधार नाही. कोणत्या प्रकारची राजकीय व्यवस्था लागू करायची यावर आम्ही चर्चा करणार नाही. इथे शरिया कायदा लागू आहे आणि लागू राहील,' अशी भूमिका तालिबानचे प्रवक्ते वहीदुल्ला हाशिमी यांनी रॉयटर्सशी बोलताना मांडली.
हजारा जिल्ह्याच्या गव्हर्नर असलेल्या सलीमा मजारी तालिबानच्या कडव्या टीकाकार होत्या. त्यांना कालच तालिबान्यांनी अटक केली. त्या शेवटपर्यंत तालिबान्यांशी लढल्या. त्यांची हत्या केली जाण्याची शक्यता आहे. तालिबान सत्तेत परत आल्यानं अल कायदा आणि इतर कट्टरपंथी संघटनांचे सदस्य आनंदात आहेत. तालिबानचं राज्य आल्यानं आता अफगाणिस्तानातात दहशतवाद्याचं केंद्रस्थान निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.