तालिबाननेअफगाणिस्तानवर कब्जा केल्यामुळे भारतात राहणाऱ्या शेकडो अफगाणी नागरिकांची काळजी वाढली आहे. चंदीगडमध्ये वास्तव्यास असलेल्या काही अफगाणी नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. तालिबानी महिलांना घरातून पळवून नेत आहेत. महिलांच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला आहे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी नोंदविल्या. दरम्यान, विमानांत माणसं कोंबून स्थलांतर करत असल्याची भयंकर परिस्थिती अफगाणिस्तानात निर्माण झाली आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा तालिबानचा क्रूर चेहरा समोर आला आहे.
काबुल विमानतळावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकावर तालिबान्यांनी थेट गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. अश्वका न्यूजने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत एक नागरिक विमानतळाच्या भिंतीवर चढून विमानतळावर जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी खालून काळ्या कपड्यातील एक बंदुकधारी या नागरिकाच्या दिशेने गोळी झाडतो. यानंतर तो नागरिक गोळी लागल्याने भिंतीवरुन खाली पडतो.
"काबुल विमानतळामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीवर तालिबानच्या व्यक्तीने गोळीबार केला. या व्यक्तिला तालिबानी मागील सरकारच्या पोलिसांप्रमाणे वागतील असं वाटलं, पण तालिबानी वेगळीच भाषा (बंदुकीची) बोलतात" असं संबंधित वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे, एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तालिबानपुढे शरणागती पत्करून राष्ट्रपती अशरफ घनी यांनी पलायन केले असतानाच प्रथमच उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबानविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले. राज्यघटनेचा आधार देऊन त्यांनी ही घोषणा केली. कोणत्याही स्थितीत तालिबान्यांसमोर गुडघे टेकणार नाही, अशी भूमिका त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केली. तालिबानला फार प्रतिकाराविना जवळपास सर्व प्रांत काबीज करता आले. काबूलमध्येही त्यांना सहज प्रवेश मिळाला. मात्र, सालेह यांच्या भूमिकेमुळे नव्याने सत्तासंघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.
दोनशे भारतीय ‘एअरलिफ्ट’, तालिबान्यांच्या तावडीतून सुटका
तालिबानने ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे काबूलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना एअरलिफ्ट करण्यास भारताने सुरुवात केली आहे. भारतीय वायुसेनेची दोन विमाने 200 भारतीयांना घेऊन मायदेशी परत आली. ही विमाने गुजरातच्या जामनगर येथे दाखल झाली. त्यात भारतीय राजदूत रुद्रेंद्र टंडन हेदेखील भारतात परतले आहेत. काबूलचे विमानतळ जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत एअर इंडियाने काबूलहून विशेष उड्डाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काबुलमध्ये 200 भारतीय नागरिक अडकले होते. त्यात दूतावासातील कर्मचारी, तसेच इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्याही जवानांचा समावेश होता. तसेच शीख बांधव एका गुरुद्वारामध्ये थांबले होते. त्यांना मायदेशी आणण्याची तयारी सुरू असताना तालिबानने हवाई सीमा बंद केल्याने अडचण निर्माण झाली होती.