काबुल: दहशतवादी संघटना तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानाततालिबानची सत्ता आल्यापासून जनतेत प्रचंड दहशत आहे. लाखो लोकांना देश सोडायचा आहे. तालिबाननं अफगाणी नागरिकांना सुरक्षेचं वचन दिलं आहे. मात्र नागरिकांचा त्यांच्या शब्दावर विश्वास नाही. कोणत्याही मार्गानं देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न नागरिकांकडून सुरू आहे. त्यामुळेच काबुल विमानतळावर प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नागरिकांनी देश सोडून जाऊ नये. सर्वांना सुरक्षा देण्यात येईल, असं आश्वासन तालिबानकडून देण्यात आलं आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे.
काबुल विमानतळ परिसरात अफगाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यांना पांगवण्यासाठी तालिबानी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात महिला, मुलं रडताना दिसत आहेत. अनेक महिला कडेवर असलेल्या आपल्या बाळांना घेऊन जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत आहेत. सुरक्षित आसरा शोधत आहेत. मात्र दहशतवाद्यांचा गोळीबार थांबताना दिसत नाही.
राजधानी काबुलच्या विमानतळावर शेकडो नागरिकांनी गर्दी केली. विमानात बसून देश सोडण्याच्या हेतूनं नागरिक विमानतळ परिसरात जमले होते. सध्या हे विमानतळ अमेरिका आणि नाटोच्या सैनिकांच्या ताब्यात आहे. विमानतळाच्या बाहेर असलेली गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागताच तालिबानी दहशतवाद्यांनी थेट गोळीबार सुरू केला. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ झाला. जीव मुठीत घेऊन लोक पळू लागले.
मदतीचा आक्रोश करणाऱ्या महिलांचा व्हिडीओ व्हायरलकाबुल विमानतळावर प्रवेश करू देण्याची विनंती करणाऱ्या अफगाणी महिलांचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. विमानतळावर प्रवेश करू देण्यासाठी महिला अमेरिकन सैन्याकडे गयावया करत आहेत. मात्र त्यांना यश येत नाही. काबुलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिका आणि नाटोच्या सैन्यानं बॅरिकेडिंग केलं आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यास त्यांच्याकडून प्राधान्य दिलं जात आहे. त्याच दरम्यान काही अफगाणी महिला विमानतळावर पोहोचल्या आणि सैनिकांकडे गयावया करू लागल्या.
व्हिडीओमध्ये महिला मदतीसाठी विनवण्या करत आहेत. रडत, आक्रोश करत महिला मदतीसाठी आवाहन करत आहेत. तालिबानी येत आहेत. ते आम्हाला मारून टाकतील. कृपया आम्हाला आत घ्या, अशा शब्दांत महिला गयावया करत आहेत. मात्र अमेरिकन सैनिकांनी दरवाजा उघडला नाही. सध्याच्या घडीला काबुल विमानतळाजवळ ५० हजारांहून अधिक अफगाणी नागरिक उपस्थित आहेत. त्यांना देश सोडून जायचं आहे. देशात थांबल्यास तालिबान्यांचे जुलूम सहन करावे लागतील अशी भीती त्यांच्या मनात आहेत.