नवी दिल्ली/काबुल: अफगाणिस्तानाततालिबानची सत्ता आल्यापासून परिस्थिती बिघडत चालली आहे. तालिबान्यांच्या दहशतीत जीवन जगण्यापेक्षा लाखो लोक देश सोडून जाणं पसंत करत आहेत. देशातल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी, राजकीय नेत्यांनीदेखील परदेशांमध्ये आश्रय घेतला आहे. महिला खासदार रंगीना करगर यांचादेखील असाच प्रयत्न होता. त्यासाठी त्या भारतात आल्या. मात्र आपल्याला नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून माघारी पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. करगर यांनी भारतावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
१५ ऑगस्टला काबूलवर तालिबाननं कब्जा केला. त्यानंतर ५ दिवसांनी करगर दिल्ली विमानतळावर पोहोचल्या. मात्र त्यांना तिथून माघारी पाठवण्यात आलं. आपल्यासोबत एखाद्या गुन्हेगारासारखं वर्तन करण्यात आलं. महात्मा गांधींच्या भारताकडून मला अशी अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत करगर यांनी नाराजी व्यक्त केली.
द इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, २० ऑगस्टला रंगीना करगर इस्तंबूलहून दिल्लीच्या विमानतळावर आल्या होत्या. त्यांच्याकडे डिप्लॉमॅटिक पासपोर्ट होता. या पासपोर्टमुळे व्हिसाशिवाय भारतात प्रवास करण्याची परवानगी मिळते. करगर याच पासपोर्टच्या आधारे अनेकदा भारतात आल्या होत्या, असा त्यांचा दावा आहे. मात्र यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना बराच वेळ वाट पाहण्यास सांगितली. जवळपास २ तास त्यांना थांबवण्यात आलं. त्यानंतर त्यांना दुबईमार्गे इस्तंबूलला पाठवण्यात आलं.
'माझ्यासोबत जे झालं, ते चुकीचं होतं. काबुलमधील परिस्थिती बदलली आहे. भारत सरकार अफगाण महिलांची मदत करेल अशी मला अपेक्षा होती. मला माझा पासपोर्टदेखील दुबईत नव्हे, तर इस्तंबूलमध्ये मिळाला. एखाद्या गुन्हेगारासोबत जसं वर्तन केलं जातं, तसं वर्तन माझ्यासोबत करण्यात आलं,' अशा शब्दांत करगर यांनी नाराजी बोलून दाखवली. ही घटना घडल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत भारतानं अफगाणच्या २ शीख खासदारांचं स्वागत केलं, याकडेही करगर यांनी लक्ष वेधलं.