मुंबई - अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलमध्ये हल्ला करत तालिबानींनी संसद आणि राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले. काबुलवर हल्ला होण्यापूर्वीच राष्ट्रपती अशरफ घनी देश सोडून पळाले. अफगाणी सैन्यांनी शरणागती पत्करली त्यामुळे तालिबानींनी २ आठवड्यात अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. त्यानंतर, उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी राष्ट्रपतीपदाची सुत्रे हाती घेतल्याचं जाहीर केलं. सध्याही अफगाणिस्तानात मोठा तणाव आहे. मात्र, अमरुल्लाह साहेल व्हॉलिबॉल खेळताना दिसून आले आहेत.
भारत सध्या अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिक आणि अफगाणींना काढण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत आहेत. काबुलहून दर दिवशी २ उड्डाणं करण्याची भारताला परवानगी आहे. अफगाणिस्तानातील हिंदू, शिख यांच्यासोबत अफगाणी मदतनीसांना बाहेर काढण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्यासोबतच, अफगाणिस्तानी नागरिकही भारतात येत आहेत. अफगाणिस्तानातील शीख खासादार रविवारी भारतात आले. त्यावेळी, अफगाणिस्तानातील परिस्थिती सांगताना त्यांना रडू कोसळलं. तसेच, तेथे सगळं संपत चाललंय, असेही ते म्हणाले.
अफगाणिस्तानवर भारताचे लक्ष
अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर भारतासह जगातील बहुतांश देश लक्ष ठेऊन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी परराष्ट्र मंत्रालयाला सांगितले की, संसदेच्या दोन्ही सभागृहातील सर्व राजकीय पक्षातील खासदारांना अफगाणिस्तानशी निगडीत सर्व घटनाक्रमाची माहिती द्यावी. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करुन हे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र खात्याला निर्देश दिलेत की, संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या खासदारांना अफगाणिस्तानच्या परिस्थितीची माहिती द्यावी. याबाबत पुढील माहिती संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून दिली जाईल असं त्यांनी सांगितले.