काबुल - अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मंगळवारी तालिबानविरोधात शेडको महिलांनी पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यानची अनेक छायाचित्रे आता समोर आली आहेत. त्यातील एक छायाचित्र आता जगाचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या छायाचित्रामध्ये बंदूक रोखून नेम धरणाऱ्या तालिबानी दहशतवाद्यासमोर एक महिला निडरपणे उभी राहिलेली दिसत आहे. (Women stand fearless in the face of Taliban terror)
तालिबानने काल काबुलच्या रस्त्यावर अनेक मोर्चांमध्ये जमा झालेल्या शेकडो लोकांना पांगवण्यासाठी गोळीबार केला होता. या घटनेने चीनमधील तियानमेन चौकात १९८९ मध्ये झालेल्या आंदोलनाची आठवण करून दिली. तालिबानविरोधात किमान तीन मोर्चे काढण्यात आले होते. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. तालिबान महिलांविरोधात क्रूरपणे वागत असल्याचा पूर्वानुभव आहे, त्या पार्श्वभूमीवर महिलांकडून तालिबानविरोधात आवाज उठवला जात आहे.
दरम्यान, टोलो न्यूजच्या पत्रकार जहरा रहिमी यांनी एका ट्विटमध्ये एका अफगाण महिलेवर बंदूक रोखलेल्या तालिबानी योध्याचा फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रामुळे १९८९ मध्ये चीनमधील तियानमेन चौकात झालेल्या आंदोलनाची आठवण ताजी झाली आहे. या फोटोखाली रहिमी लिहिते की, एक अफगाण महिला निडरपणे तालिबानच्या त्या हत्यारबंद जवानासमोर उभी आहे. ज्याने तिच्या छातीवर बंदूक रोखली आहे.
काबुलवर तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये पूर्वीच्या दडपशाहीची पुनरावृत्ती होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यावेळी लोकांना स्टेडियममध्ये सार्वजनिकरीत्या ठार मारण्यात आले होते. असे असूनही यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधी आंदोलनांची संख्या वाढत आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यांवर उतरून मोर्चा काढताना, बॅनर घेऊन घोषणाबाजी करताना दिसत आहेत. दरम्यान, काबुलमध्ये या आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसोबत तालिबानी दहशतवाद्यांनी गैरवर्तन केले होते. तसेच त्यांना वार्तांकन करण्यापासून रोखले होते.