काबूल : पंजशीरमध्ये तालिबान आणि नॅशनल रेझिस्टंस फोर्समध्ये घमासान युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये अफगाणिस्तानचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांचा भाऊ रोहूल्ला सालेह याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. तालिबानी दहशतवाद्यांनाही मोठे नुकसान झेलावे लागल्याचे सांगितले जात आहे. (Amarullah Saleh's brother killed in Taliban attack.)
इरानी मीडियानुसार पंजशीर घाटीमध्ये विविध भागांत दोन्ही गटांदरम्यान युद्ध सुरु आहे. गुरुवारी रात्री तालिबान आणि अमरुल्ला सालेह समर्थकांमध्ये भीषण युद्ध झाले. यामध्ये रोहल्ला सालेहचा मृत्यू झाला आहे. तालिबानचा दावा आहे की, अमरुल्ला सालेह यांनी ज्या लायब्ररितून काही दिवसांपूर्वी व्हिडीओ प्रसारित केलेला त्या लायब्ररीपर्यंत ते पोहोचले आहेत.
तालिबानने त्यांचे दहशतवादी या लायब्ररीमध्ये घुसतानाचे फोटो जारी केले आहेत. यात जिथे हे दहशतवादी बसलेले दिसत आहेत, तिथे अमरुल्ला सालेह बसलेले होते. दुसरीकडे अहमद मसूद याचे समर्थक मार्शल दोस्तम यांनी ताजिकिस्तान आणि उज्बेकिस्तानसह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदत मागितली आहे. तसेच तालिबानी सरकारला घाईगडबडीत मान्यता देऊ नये अशी मागणी केली आहे. तालिबानचे मंत्री जगाचे दहशतवादी आहेत.