काबूल: अफगाणिस्तानात सध्या तालिबानची सत्ता आहे. तालिबानच्या आधीच्या शासन काळात महिलांवर अनन्वित अत्याचार झाले. आताही तशीच परिस्थिती होईल असे अनेकांचे मत आहे. पण, यातच आता न्यूझीलंडच्या एका गरोदर महिला पत्रकाराने चक्क तालिबानकडेच मदत मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडची रहिवासी असलेली एक गरोदर महिला पत्रकार अफगाणिस्तानात अडकली असून, तिला तिच्याच देशात येण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळेच तिने आता आपल्या देशात परत जाण्यासाठी तालिबानकडे मदत मागितली आहे. शार्लोट बेलिस असे या पत्रकाराचे नाव असून, कोरोना आयसोलेशनच्या नियमांमुळे तिला न्यूझीलंडमध्ये प्रवेश मिळू शकला नाही, असे तिचे म्हणणे आहे. न्यूझीलंड हेराल्डमध्ये शनिवारी प्रकाशित झालेल्या लेखात, बेलिस म्हणाली, तालिबानला महिलांवरील वागणुकीबद्दल प्रश्न विचारले होते, आता तेच प्रश्न मला माझ्या सरकारला विचारावे लागत आहेत.
बेलिस यांनी लेखात म्हटले की, 'जेव्हा एका अविवाहीत आणि गरोदर महिलेला तालिबान आश्रय देतो, तेव्हा तुमची परिस्थिती किती वाईट असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता.' न्यूझीलंडचे कोरोना प्रकरणातील मंत्री क्रिस हिपकिन्स यांनी बेलिसच्या बाबतीत योग्य प्रक्रिया पाळली आहे की नाही हे शोधण्याचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान, न्यूझीलंडला कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात मोठे यश आले आहे. येथील लोकसंख्या फक्त 50 लाखांच्या जवळपास आहे. असे असूनही कोरोनामुळे मृतांची संख्या केवळ 52 आहे.
दहा दिवसांचा आयसोलेशन नियम
परदेशातून न्यूझीलंडला परतणाऱ्या नागरिकांना लष्कराच्या हॉटेलमध्ये दहा दिवस आयसोलेट राहावे लागणार आहे. यामुळेच आपल्या देशात परतण्याची वाट पाहणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. बेलिससारख्या कथा पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न आणि त्यांच्या सरकारसाठी लाजिरवाण्या आहेत. बेलिस बऱ्याच काळापासून अफगाणिस्तानमधून रिपोर्टिंग करत आहेत. गेल्या वर्षी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यापासून त्या तिथे कार्यरत आहे. तालिबानला महिला आणि मुलींना मिळणाऱ्या वागणुकीबाबत प्रश्न विचारून त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.