काबुल: अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर सलग दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. अमेरिकेन या वृत्ताला दुजोरा दिलाय. दरम्यान, एका मागे एक झालेल्या दोन स्फोटात आतापर्यंत ४० जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे, तर सुमारे १२० जण जखमी झालेत. मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्यामागे ISIS या दहशतवादी संघटनेचा हात आहे.
अफगाणिस्तानच्या माध्यमांनुसार, पहिला बॉम्बस्फोट काबुल विमानतळाच्या एबी गेटजवळ झाला. या घटनेला दुजोरा देताना अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, 'आम्ही काबुल विमानतळाजवळ या स्फोटाची पुष्टी करतो. सध्या या घटनेतील मृतांची माहिती स्पष्ट नाही. तपशील मिळाल्यावर त्याची माहिती दिली जाईल.
४ अमेरिकन सैनिकांचा मृत्यूरशियन मीडिया स्पुतनिकनं १३ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. तर, फॉक्स न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार या स्फोटात ४ अमेरिकन सैनिकांचाही मृत्यू झालाय. विमानतळाजवळील बॅरन हॉटेलजवळ हा स्फोट झाला, तर दुसरा स्फोट विमानतळाच्या अब्बे गेटजवळ झाला. इथेच अमेरिकन सैनिक तैनात होते.
अमेरिकेला होता हल्ल्याचा संशय
काबुल विमानतळाबाहेर या बॉम्बस्फोटाच्या २४ तास आधी अमेरिकेनं तेथे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली होती. २५ ऑगस्ट रोजी अमेरिकेनं एक अॅडव्हायजरी जारी करुन अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांना विमानतळावरुन शक्य तितक्या लवकर दूर जाण्यास सांगितलं होतं. तसेच फ्रान्स दुतावासातून देखील अलर्ट जारी करण्यात आला होता. तरीदेखील अखेर ज्याची भीती होती ती घटना आज घडली.