काबुल:अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून, मोठ्या प्रमाणात लोक जखमीही झाले आहेत. सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर हा आत्मघातकी हल्ला झाला, तसेच घटनास्थळावर गोळीबारही झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याच संघटनेनं घेतलेली नाही.
दरम्यान, तालिबानकडून राजधानीत झालेल्या स्फोटाबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून काबुलमध्ये सातत्याने स्फोट होत आहेत. यातील बहुतांश बॉम्बस्फोट इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या संघटना करत आहेत. मात्र, लवकरच इस्लामिक स्टेटवर मात करून देशात शांतता प्रस्थापित करू, असे तालिबानने म्हटले आहे. मात्र, युद्धग्रस्त देशाच्या उत्तर भागात इस्लामिक स्टेटचे बळ वाढत आहे. आतापर्यंत या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानच्या विविध भागात स्फोट घडवून आणले आहेत.
ऑगस्टमध्ये काबुल विमानतळावर मोठा स्फोट
काबुलमधील सर्वात धोकादायक स्फोट ऑगस्टमध्ये विमानतळावर झाला होता. अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा असल्यापासून देश सोडू पाहणारे लोक मोठ्या संख्येने काबुल विमानतळावर जमले होते. 26 ऑगस्ट रोजी झालेल्या या स्फोटात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 150 हून अधिक लोक जखमी झाले होते. हल्ल्यांबाबत रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, काबुल विमानतळाबाहेर दोन आत्मघाती हल्ले करण्यात आले. 31 ऑगस्टची अंतिम मुदत जवळ आल्याने विमानतळावर संभाव्य हल्ल्याची भीती पाश्चात्य राष्ट्रांना आधीच व्यक्त केली होती.
स्फोटाची माहिती आधीच देण्यात आली होती
इस्लामिक स्टेटने हा स्फोट घडवून आणला होता. स्फोटापूर्वी अनेक देशांनी आपल्या लोकांना विमानतळापासून दूर राहण्यास सांगितले होते. अफगाणिस्तानमधील काबुल विमानतळावर जमलेल्या लोकांना लक्ष्य करणाऱ्या इस्लामिक स्टेट (IS किंवा ISIS) च्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे गुप्तचर अहवाल आहेत, असा इशारा ब्रिटिश सरकारने दिला आहे. मात्र, एवढं होऊनही हल्ले थांबवता आले नाहीत.