लोकांना खोटी स्वप्नं दाखवून सत्तेत आलेल्या तालिबानी संघटनेने आता आपला खरा क्रूर चेहरा दाखवायला सुरुवात केली आहे. आधी मुलींना शिकवू असं म्हणणाऱ्या तालिबानींकडून आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या, आवाज उठवणाऱ्या विद्यार्थिंनीवरच आता हल्ला केला जात आहे. अफगाणिस्तानातील असाच एक धक्कादायक व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एका विद्यापीठातील विद्यार्थिनींनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठविला म्हणून त्या विद्यार्थिनींना चाबकाचे फटके मारल्याचं पाहायला मिळत आहे.
विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी बुरका घातला नाही म्हणून त्यांना विद्यापीठाचे गेट बंद करुन प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे या विद्यार्थिनींनी आंदोलन केलं. हा सर्व प्रकार उत्तर पूर्व अफगाणिस्तानातील बदख्शान विद्यापीठात घडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, काही विद्यार्थिनीनी विद्यापीठाचं गेट बंद केल्याने त्यासमोर आंदोलन करत होत्या. त्यावेळी तालिबान सरकारमधील सदाचार मंत्रालयाकडून विद्यार्थिनींना चाबकाचे फटके मारण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी अफगाणिस्तानात तालिबान सरकार सत्तेत आल्यानंतर तालिबान्यांकडून नागरिकांवर अन्याय केला जात आहे. महिलांचा आवाज दाबण्यात येत आहे. स्वातंत्र्याचे त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यांनी काय बोलावे, त्यांनी कोणते कपडे वापरावे, त्यांनी नोकरी कोणत्या ठिकाणी करावी, त्यांनी कुठे शिकावं या सगळ्या गोष्टींचा निर्णय तालिबानीच घेत आहेत.
इयत्ता सहावीनंतर शाळेत जाण्यावर त्यांच्याकडून बंदीही घातली जात आहे. अफगाणिस्तानातील महिलांना सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे वापरावे त्यासाठी तालिबान मंत्रालयाकडून नियम करण्यात येत आहे. तेथील महिलांना नकाब किंवा बुरका घातल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी त्यांना प्रवेशही दिला जात नाही. तालिबान सरकारच्या या निर्णयाविरोधात आणि शिक्षणाच्या हक्कासाठी येथील महिला आणि विद्यार्थिनींनी आवाज उठवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"