काबूल - तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून तेथील जनता प्रचंड दहशतीखाली आहे. गेल्या काही दिवसांपासून काबूलसह विविध शहरांमध्ये तालिबान सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या आंदोलनाचे अथवा निदर्शनांचे नेतृत्व महिला करत आहेत. मात्र, तालिबान ही निदर्शने दडपण्याचा प्रयत्न करत आहे. तालिबानने अंतरिम सरकारची घोषणा केल्यानंतर, महिलांनी काबूलमध्ये विविध ठिकाणी निदर्शने केली आणि सरकारमध्ये वाटा मागितला आहे. (Afghanistan Taliban beats protesters in kabul women journalists fighters)
खरे तर, महिलांचे हे निदर्शन फार छोटे होते, मात्र, या निदर्शनानेही तालिबान्यांना हादरा दिला आहे. तालिबानची झोप उडवली आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी महिलांना मारहाण केली. एवढेच नाही, तर तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. आता सरकारच्या स्थापनेनंतर लगेचच, परवानगीशिवाय कुणालाही कुठल्याही प्रकारचे निदर्शन करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे तालिबानने म्हटले आहे.
चीनची मोठी खेळी! नव्या तालिबान सरकारसाठी ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यांत तालिबानी दहशतवादी महिलांना मारहाण करताना दिसत आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी महिला आणि पत्रकारांना लाठ्या आणि रायफलने मारहाण केली. तसेच अनेक पत्रकारांना अटक करून मारहाण करण्यात आली.
तालिबानने सत्ता बळकावल्यानंतर, महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. आता तेथे मुले आणि मुली शाळा तथा महाविद्यालयांमध्ये एकत्रपणे शिकू शकत नाहीत. याशिवाय त्यांनी काय परिधान करावे काय करू नये, यावरही बंधने घालण्यात आली आहेत. तेथे महिलांना आता बाहेर काही कामही करू शकत नाहीत. यापूर्वी आपण आपल्या सरकारमध्ये महिलांनाही वाटा देऊ, असे तालिबानने म्हटले होते.
तत्पूर्वी, काबुल शिवाय, मजार-ए-शरीफ आणि इतर शहरांमध्येही गेल्या दोन-तीन दिवसांपासून निदर्शने तीव्र झाली आहेत. अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्येही अफगाणिस्तानच्या नागरिकांनी निदर्शने केली. अफगाण नागरिकांमध्ये तालिबान व्यतिरिक्त पाकिस्तानबद्दलही रोष आहे. पाकिस्तानी हवाई दलाने नकतेच पंजशीर परिसरात ड्रोन हल्ले केले होते.