अफगाणिस्तानात भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. तालिबान्यांच्या भीतीमुळे नागरिक देश सोडण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. याच दरम्यान एका अफगाणी महिलेने अमेरिकेच्या विमानात जर्मनीत बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. महिलेने अमेरिकेच्या सी -17 ग्लोबमास्टर या विमानामध्ये एका बाळाला जन्म दिला आहे. अफगाणिस्तानातून वाचवण्यात आलेल्या इतर नागरिकांसोबत या महिलेला अमेरिकेत नेण्यात येत होतं. एअरबेसवरून जाताना महिलेला विमानात प्रसूती वेदना सुरू झाल्या.
वैमानिकाने हवेचा दाब वाढल्याने विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. यानंतर अमेरिकेच्या हवाई दलाच्या जवानांनी जर्मनीतील रामस्टीन विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. लँडिंग होताच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विमानातच महिलेची प्रसूती केली. अमेरिकेच्या हवाई दलाने याबाबत ट्विट केलं असून आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती दिली आहे. अफगाणिस्तानमधून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी जमा होत आहे. याच दरम्यान आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे. काबुल विमानतळाबाहेर लोकांची गर्दी झाल्याने तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली.
काबुल विमानतळाबाहेर भीषण परिस्थिती; गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू
काबुल विमानतळाबाहेर गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटीश लष्कराने याबाबतची माहिती दिली आहे. "अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती सुरक्षितरित्या हाताळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जे काही आवश्यक आहे ते केलं जात आहे" असं ब्रिटीश लष्कराने आपल्या निवेदनात सांगितलं आहे. भारतीय हवाई दलाला मोठं यश आलं आहे. भारतीय हवाई दलाचं सी-17 विमान आज सकाळी काबुलहून 168 जणांना घेऊन भारतात दाखल झालं आहे. गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुसेनेचं हे विमान उतरलं आहे. याठिकाणी वायुसेनेकडून सर्व नागरिकांच्या उतरविण्यात आलं असून त्यांची सर्व काळजी वायुसेनेकडून घेतली जात आहे. यात अनेक लहान मुलं, महिला आणि अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणाऱ्यांचाही समावेश आहे.
परिस्थिती गंभीर! Video व्हायरल झालेल्या 'त्या' बाळाचं नेमकं काय झालं?; जाणून घ्या, 'सत्य'
अफगाणिस्तानमधून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर मोठी गर्दी जमा होत आहे. येथे ब्रिटीश आणि अमेरिकन सैनिकही भावूक झाले आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अशी अनेक दृश्य पाहून सैनिकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. असाच एक काळजात चर्र करणारा व्हिडीओ आता समोर आला आहे. आपल्या लेकाचा जीव वाचवण्यासाठी हतबल आईने बाळाला सैनिकाकडे सोपवलं. त्याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सैनिकाकडे सोपवलेल्या बाळाचं नेमकं नंतर काय झालं? अशा प्रश्न अनेकांना पडला होता. यावर आता अमेरिकन सैन्याने ते बाळ पुन्हा त्याच्या वडीलांकडे सोपवल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओशी संबंधित माहिती दिली आहे. "काबूल विमानतळावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अमेरिकी लष्कराच्या अधिकाऱ्याने एका अफगाणी बाळाला तारेच्या कुंपणावरुन घेतले होते. आता त्या बाळाला त्याच्या वडिलांकडे पुन्हा सोपवण्यात आले असून ते विमानतळावर सुरक्षित आहे" अशी माहिती अधिकाऱ्यांनी आता दिली आहे.