अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबाननं(Taliban) कब्जा केल्यानंतर या दहशतवादी संघटनेविरोधात काही लोक एकजूट झाले आहेत. पुर्वेकडे तालिबानविरोधात लढणाऱ्या अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद (Ahmed Masood)याने तालिबानविरोधात मोर्चा उघडला आहे. तालिबानविरोधात या युद्धासाठी मसूदनं जगातील अन्य देशांकडे मदत मागितली आहे.
वॉश्गिंटन पोस्टशी संवादात अहमद मसूद म्हणाला की, मुजाहिदीनचं सैन्य पुन्हा एकदा तालिबानशी लढण्यास सज्ज आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारुगोळा आहे. अफगान नॅशनल रेजिस्ट्रेस फ्रंटचे नेते अहमद मसूद यांनी तालिबानविरुद्ध संघर्ष जारी ठेवण्याची घोषणा करत वडिलांच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. मुजाहिदीनची माणसं तालिबानशी टक्कर घेण्यासाठी तयार आहेत. माझ्या आवाहनानंतर अनेकजण आमच्याशी जोडले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच सैन्याचे काही जवानही आमच्यासोबत आहेत ज्यांनी शरणागती पत्करायला विरोध केला होता. त्यामुळे आता आम्ही दुसऱ्या देशांना मदतीचं आवाहन करतो. तालिबान केवळ अफगाणिस्तानाचा नव्हे तर संपूर्ण जगाचा शत्रू आहे. तालिबानच्या राज्यात अफगाणिस्तान दहशतवाद्यांचा गड बनेल असं अहमद मसूदने सांगितले आहे. मसूदसोबत अफगाणिस्तानचे कार्यवाह राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनीही तालिबानविरोधात संघर्ष सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट केले आहे.
सालेह यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे की, मी त्या लाखो लोकांना निराश करणार नाही ज्यांनी मला निवडून दिलं आहे. मी तालिबानसोबत कधीही राहणार नाही. आता अमेरिकेसोबत चर्चा करण्यात काही अर्थ नाही. अफगाणी लोकांना हे सिद्ध करावं लागेल. अमेरिका आणि नाटोपासून वेगळं झालो तरीही आम्ही पराभव स्वीकारला नाही. सालेह काबुलच्या पूर्वोत्तर स्थित पंजशीर घाटीकडे कूच केली आहे. सालेह आणि मसूद यांनी पंजशीरमध्ये तालिबानविरोधात गुरिल्ला मूवमेंटसाठी एकत्र झाले आहेत. सेव्हियत संघाच्या युद्धातही तालिबानला पंजशीर प्रदेश ताब्यात घेता आला नव्हता. आम्ही पूर्ण ताकदीनं तालिबानींना विरोध करू असं त्यांनी म्हटलं आहे.
अफगाणिस्तानात लोकशाही लागू होणार नाही
अफगाणिस्तान(Afghanistan) मध्ये तालिबान(Taliban) जोपर्यंत नवीन सरकारची स्थापना करत नाहीत तोवर एक काऊन्सिल संपूर्ण देश चालवणार आहे. तालिबानी सध्या अफगाणिस्तानमधील नेत्यांची, सैन्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. रॉयटर्सनुसार, तालिबानी नेत्याने सांगितले की, ते सर्व नेत्यांशी, अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यानंतर नवीन सरकारची स्थापना केली जाईल. परंतु एक गोष्ट नक्की ती म्हणजे अफगाणिस्तानात लोकशाही नसणार आहे. लोकशाही पद्धतीने देश चालणार नाही त्यामुळे अफगाणिस्तानात शरिया कायदा लागू होणार हे स्पष्ट आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यापासून तेथील लोकं देश सोडून पळत आहेत. काबुल एअरपोर्टवरील विदारक स्थिती जगानं पाहिली आहे. विमानात अक्षरश: जीव धोक्यात घालून ते घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण विमानावर चढून बसत आहे. लोकांच्या मनात तालिबानची इतकी दहशत आहे की, ते अफगाणिस्तानात थांबायला तयार नाहीत.