अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबानींनी कब्जा केल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी देशाबाहेर पळून गेले असून, त्यामुळे अफगाण सैनिक आणि पोलिसांनीही आपली शस्त्रे टाकून दिली आहेत. ते तालिबानींना शरण जात आहेत. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. याच दरम्यान पुन्हा एकदा तालिबानचा क्रूर चेहरा समोर आला आहे. गरिबी आणि बेरोजगारीचं वृत्तांकन केलं म्हणून एका पत्रकाराला बेदम मारहाण केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
अफगाणिस्तानमधील टोलो न्यूजच्या पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. जिआर खान याद असं मारहाण करण्यात आलेल्या पत्रकाराचं नाव आहे. जिआर हे काबूलमधील बेरोजगारी, गरीबी आणि दारिद्र्य या विषयावर वृत्तांकन करत होते. त्यावेळी तालिबान्यांनी त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली. याआधी टोलो न्यूजच्या पत्रकाराची तालिबानने हत्या केल्याची बातमी कंपनीने दिली. मात्र थोड्याच वेळात या पत्रकाराने ट्विटरवरुन खुलासा करत आपल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच आपण जीवंत असल्याचं सांगितलं आहे. ट्विटर अकाऊंटवरून जिआर यांनी नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे.
"काबुलमध्ये रिपोर्टींग करताना तालिबान्यांनी मला बेदम मारहाण केली होती. कॅमेरा, तांत्रिक उपकरणे आणि माझा मोबाईल देखील हायजॅक करण्यात आला आहे. काही लोकांनी माझ्या मृत्यूची बातमी पसरवली मात्र ती खोटी आहे" असं जिआर खान याद यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तालिबानने आता अफगाणिस्तानमध्ये आपले नवीन सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलली जात आहेत. तालिबान नेत्यांकडून देशाच्या धोरणांबाबत निर्णय घेतले जात आहेत. याच दरम्यान तालिबानने अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेच्या नव्या कार्यकारी गर्व्हनरच्या नावाची घोषणा केली आहे.
ना उच्च शिक्षण, ना कोणतंही ट्रेनिंग; तरीही तालिबानने 'या' व्यक्तीला केलं अफगाण बँकेचं हेड
तालिबानने हाजी मोहम्मद इदरीस (Haji Mohammad Idris ) याला बँकेच्या गर्व्हरनरपदी नियुक्त केले आहे. हाजी मोहम्मद इदरीस याच्याकडे ना उच्च शिक्षण, ना कोणतंही ट्रेनिंग तरीही तालिबानने त्याला अफगाण बँकेचं हेड केलं आहे. इदरीस हा तालिबानी नेता मुल्ला अख्तर मन्सूरच्या आर्थिक बाबी सांभाळत होता. मुल्ला अख्तर मन्सूर हा 2016 मध्ये झालेल्या एअरस्ट्राईकमध्ये मारला गेला होता. इदरीसने कोणतेही उच्च शिक्षण घेतलेले नाही. त्याशिवाय तो आर्थिक विषयातील जाणकार, तज्ज्ञदेखील नाही. मात्र, तो तालिबानचा आर्थिक व्यवहार मागील काही काळापासून सांभाळत आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे.