अफगाणिस्तानात एका आठवड्यात सर्वकाही बदलून गेले. ज्याठिकाणी लोक सुखाने जीवन जगत होते तिथं आज भयाण शांतता पसरली आहे. तालिबानींची क्रूरता पाहून अनेकजण भयभीत आहेत. घराघरात घुसून तालिबानी जबरदस्तीनं लोकांकडून वेगवेगळ्या मागण्या करत आहेत. अफगाणमधील माजी न्यायाधीश यांनी सांगितलेला प्रकार ऐकून अंगावर काटा येईल. तालिबानींची हा चेहरा जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
तालिबानी घरात घुसून जेवण मागत आहेत. त्यात एका घरात खराब जेवण बनवल्यानं तालिबानीने त्या महिलेला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार माजी न्यायाधीशांनी सांगितला आहे. द सन या रिपोर्टनुसार, माजी अफगाणी न्यायाधीश आणि महिला हिंसा रोखण्यासाठी प्रयत्न करणारे नजला अयूबी यांनी सांगितले की, महिलांसोबत गैरवर्तवणूक आणि भयानक हिंसाचार तालिबानींकडून होत आहे. अफगाणिस्तानच्या उत्तरेकडे एका महिलेला खराब जेवण बनवल्यामुळे तालिबानीने या महिलेला जिवंत जाळल्याची क्रूर कहानी समोर आली आहे.
तालिबानी लोकांना जेवण देणे आणि जेवण बनवण्यासाठी जबरदस्ती करत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक युवतींना पेटाऱ्यात बंद करुन शेजारील देशांमध्ये पाठवलं जात आहे. या मुलींचा वापर सेक्ससाठी केला जाऊ शकतो. अफगाणी कुटुंबातील युवा मुलींचा विवाह तालिबानी युवकांसोबत करण्यासाठी दबाव आणला जात आहे असंही माजी न्यायाधीश अयूबी यांनी सांगितले. अफगाणिस्तानमध्ये संविधान निर्माण करण्याच्या प्रक्रियेत अयूबी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
अयूबी हे अफगाणिस्तानमधील अटॉर्नी जनरल कार्यालयात ज्येष्ठ अटॉर्नी म्हणून काम करत होते. परवन प्रांतातील न्यायालयात त्यांनी न्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तालिबानींकडून एकीकडे महिलांचा सरकारमध्ये समावेश करण्याचा त्यांना सुरक्षा देण्याचा शब्द दिला जात आहे. परंतु दुसरीकडे बुरखा न घातलेल्या महिलांना गोळ्या झाडणे, खराब जेवण दिल्यानंतर महिलेला जिवंत जाळणे अशा घटना समोर येत असल्याने अफगाणी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
फॉक्सच्या न्यूजनुसार, एका महिलेने ताखर प्रांताची राजधानी तालोकानमध्ये बुरखा घातला नव्हता. तिला गोळ्या झाडून मारण्यात आले. बुधवारी या महिलेचा एक फोटो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं. अलीकडेच तालिबानी संघटनेचे नेते Zabihullah Mujahid ने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर जल्लोष व्यक्त केला त्याचसोबत आता अफगाणिस्तानात लोकशाही ठेवणार नसून तिथे शरिया कायद्यानुसार सरकार चालवलं जाईल असं जाहीर केले आहे.