अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबानींनी कब्जा केल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी देशाबाहेर पळून गेले असून, त्यामुळे अफगाण सैनिक आणि पोलिसांनीही आपली शस्त्रे टाकून दिली आहेत. ते तालिबानींना शरण जात आहेत. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. याच दरम्यान पुन्हा एकदा तालिबानचा क्रूर चेहरा समोर आला आहे. तालिबान्यांनी घोर प्रांतात एका गर्भवती अफगाणी पोलीस महिलेला तिच्या कुटुंबासमोरच गोळ्या मारून ठार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
निगारा असं या गर्भवती अफगाणी महिला पोलिसाचं नाव आहे. त्यांना पती आणि मुलांसमोर फिरोजकोह येथील तिच्या घरी मारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अफगाणिस्तानचे पत्रकार बिलाल सरवारी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. "महिला पोलीस अधिकारी निगारा यांना मुलं आणि पती यांच्यासमोर रात्री दहा वाजता घोर प्रांतात गोळ्या घालून ठार करण्यात आलं. निगारा या सहा महिन्यांच्या गरोदर होत्या" असं म्हटलं आहे. बिलाल सरवारी यांनी निगारा यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या हवाल्याने हे ट्विट केलं आहे. मात्र, तालिबानने निगारा यांच्या हत्येत आपला कोणताही सहभाग नसल्याचं म्हटलं आहे.
तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी "तालिबानने निगारा यांची हत्या केलेली नाही. मात्र, आमची चौकशी सुरू आहे" असं म्हटलं आहे. तालिबान कशाप्रकारे अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देतंय याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे. तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एका अफगाणी स्त्रीची मन सुन्न करणारी गोष्ट समोर आली आहे. अफगाणिस्तानमध्ये पोलीस खात्यात सेवा बजावलेल्या महिलेने तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची माहिती दिली आहे. खातेरा हाशिमा असं य़ा महिलेचं नाव आहे. "तालिबान अजिबात बदलला नाही, अगदी 20 वर्षांपूर्वी होता तसाच आहे. मी गर्भवती असताना देखील तालिबान्यांनी माझे अपहरण केले होते. त्यानंतर अत्याचार करत माझ्या डोक्यात गोळ्या झाडल्या गेल्या आणि माझे डोळे बाहेर काढण्यात आले" अशी धक्कादायक माहिती खातेरा यांनी दिली आहे.
हृदयद्रावक! "तालिबानींनी माझं अपहरण केलं, डोक्यात गोळ्या झाडल्या आणि नंतर काढले डोळे"
अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही महिलेचे घराबाहेर पडणे तालिबानच्या नजरेत पाप आहे. जे खातेरा यांच्यासोबत घडले ते तिथल्या अनेक महिलांसोबत घडत आहे. त्या महिला बाहेर येऊ शकत नाहीत, कोणाला काही सांगू शकत नाहीत असं देखील खातेरा यांनी सांगितले. खातेरा सध्या भारतात आहेत पण अफगाणिस्तानमध्ये झालेल्या अत्याचाराबाबत सांगतांना त्यांचा अंगावर काटा उभा राहिला. इस्लामच्या नावाखाली तालिबान अफगाणी लोकांना धमकावत आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे. खातेरा यांना त्यांच्या वडिलांनी अफगाण पोलिसात सामिल होण्यापासून रोखले होते. खातेरा यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना समजलं की तिचे वडील तालिबानशी संलग्न आहेत. तिच्या वडिलांना खातेरावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती होती. पण त्यांनी तिला वाचवले नाही. त्यामुळे मला वडिलांकडूनच धोका मिळाल्याचे खातेरा हाशिमा यांनी म्हटलं आहे.