तालिबानने ताबा मिळविल्यानंतर अमेरिकेने तेथून आपल्या तसेच देश सोडून बाहेर जाणाऱ्या अफगाण नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या प्रयत्नांची गती मंदावली आहे. काबूल विमानतळापर्यंत येण्याच्या मार्गात ठिकठिकाणी तालिबानी बंडखोरांनी उभे केलेले सशस्त्र चेक पॉइंट तसेच कागदोपत्री अडचणींमुळे नागरिकांना वेगाने एअरलिफ्ट करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. काबूलसह अनेक ठिकाणी तालिबानने सशस्त्र चेक पॉइंट उभारले आहेत. त्यामुळे लोकांना विमानतळावर पोहोचायला अतिशय अडथळे निर्माण झाले आहेत. याच दरम्यान अनेक भयंकर घटना समोर येत आहेत.
अफगाणिस्तानात भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. तालिबान्यांच्या भीतीमुळे नागरिक देश सोडण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. अशातच काबूल विमानतळावर अमेरिकी, ब्रिटनचे सैनिक आणि अफगाण नागरिकांना वेगवेगळं करण्यासाठी तारेचं कुंपण घालण्यात आलं आहे. परंतु देश सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही अफगाणी महिला आपल्या लहान मुलांना तारेच्या कुंपणापलीकडे फेकताना दिसत आहेत. अशातच काही मुलं या कुंपणांमध्येच अडकून पडल्याचा रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे.
काबूल विमानतळावर हताश नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक महिला आपल्या मुलांना घेऊन विमानतळावर धावताना दिसत आहेत. देश सोडून जाणाऱ्या नागरिकांपासून अमेरिकी आणि ब्रिटनच्या सैनिकांना वेगळं करण्यासाठी काबूल विमानतळावर रेंज वायर (Range Wire) लावण्यात आली आहे. तारांचे कुंपण आणि दरवाज्यांमागून अफगाणी पुरुष आणि महिला या जवानांकडे मदतीची याचना करताना दिसत आहेत. यातच काही महिला आपली मुलं या तारांच्या कुंपणांवरुन पलीकडे फेकताना दिसून आल्या आहेत.
ब्रिटीश सैनिक हे दृश्य पाहून अत्यंत भावूक झाले आहेत. अफगाणी महिला आपली मुलं रेंजर तारांवरुन पलीकडे फेकत होत्या. हे दृश्य खरोखरच भयानक होतं. सैनिकांनी आपल्या मुलांना घ्यावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र यातील काही मुलं तारांमध्येच अडकून पडली असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. काबुल विमानतळावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकावर तालिबान्यांनी थेट गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
तालिबानचा क्रूर चेहरा! काबुल विमानतळावर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकावर गोळीबार; Video व्हायरल
अश्वका न्यूजने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत एक नागरिक विमानतळाच्या भिंतीवर चढून विमानतळावर जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी खालून काळ्या कपड्यातील एक बंदुकधारी या नागरिकाच्या दिशेने गोळी झाडतो. यानंतर तो नागरिक गोळी लागल्याने भिंतीवरुन खाली पडतो. "काबुल विमानतळामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीवर तालिबानच्या व्यक्तीने गोळीबार केला. या व्यक्तिला तालिबानी मागील सरकारच्या पोलिसांप्रमाणे वागतील असं वाटलं, पण तालिबानी वेगळीच भाषा (बंदुकीची) बोलतात" असं संबंधित वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.