तालिबाननंअफगाणिस्तानवर रविवारी कब्जा मिळवला. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तसंच हत्यारं असलेले तालिबानी राष्ट्रध्यक्षांच्या भवनातही वावरत असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, तालिबान आणि अफगाणिस्तानच्या चर्चेनं आता जोर पकडला आहे. काही लोकांनी हा अमेरिकेचा पराभव असल्याचंही म्हटलं आहे. याचदरम्यान, सोमवारी काही अफगाणी नागरिकांनी अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या बाहेर निदर्शने केली. तसंच त्यांनी बायडेन प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली. अफगाणिस्तानमधील परिस्थितीला बायडेन प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही नागरिकांनी यावेळी केला.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या सैन्याला माघारी बोलावणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तालिबाननंही पुन्हा सक्रिय होण्यास सुरूवात केली होती. अमेरिकन लष्कर जसं मागे परतू लागलं तसं अवघ्या काही कालावधीत तालिबाननं अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा केला. रविवारी तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला. तसंच आपल्याला रक्तपात टाळायचा असल्याची प्रतिक्रिया तालिबाननं दिली. तसंच हे युद्ध संपलं असून अफगाण लोकांना लवकरच हे सरकार कसं असेल हे समजणार असल्याचंही तालिबानच्या प्रवक्त्यानं सांगितलं होतं.