अफगाणिस्तानमध्येतालिबानचा (Taliban) कब्जा होऊन आता एक महिना पूर्ण झाला आहे. परंतु तालिबानसोबत लढाई ही अनेक वर्षांपासून सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून अफगाणिस्तानातील (Afghanistan) अनेक भागांमध्ये कामकाज ठप्प आहे. त्यामुळे लोकांकडे कमाईचं साधनच शिल्लक राहिलेलं नाही. अशा परिस्थितीत लोकांना घर खर्च भागवण्यासाठी घरातील सामानच विकण्याची परिस्थितीत ओढावली आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एक असा बाजार भरत आहे, ज्या ठिकाणी लोकं आपल्या घरांचं सामन आणून विकत आहेत. कोणी आपल्या घरातील बेड, इतर फर्निचर, किचनमधील सामान विक्रीसाठी आणत आहे. अनेक जण या ठिकाणी आपल्या घरातील वस्तूंची विक्री करत आहे, जेणेकरून त्याच्या विक्रीतून पैसे मिळतील आणि खाण्यापिण्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचीही खरेदी करता येईल. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या कालावधीसाठी रकमेचंही संकट उभं राहिलं होतं. लोकांना अनेक तास एटीएम आणि बँकांच्या रांगेत उभं राहावं लागत होतं. तसंच बाजार बंद असल्यानं वस्तू खरेदी करण्यासाठीही मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता.
निर्बंधांमुळे समस्यासध्या तालिबाननं सरकार स्थापन केल्यानं काही प्रमाणात कामकाजाला सुरूवात झाली आहे. परंतु आताही अनेक समस्या समोर आहे. अनेक ठिकाणी महिलांना कामावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, तर अनेक ठिकाणी तालिबानच्या काही लोकांकडून निर्बंध घालण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत अनेक लोक आपल्या घरातील सामान विकून आपले दिवस पुढे ढकलत आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर अनेक लोकांनी देश सोडला आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानात राहणाऱ्या लोकांसमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. तालिबाननं नागिरकांना आपल्या कार्यालयांमध्ये पुन्हा रूजू होण्याचं आवाहनही केलं आहे. परंतु अद्यापही लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.