अफगाणिस्तानमध्ये मोठा अपघात घडला आहे. मंगळवारी रात्री दक्षिणी हेलमंदच्या नवा जिल्ह्यामध्ये अफगाण हवाईदलाच्या दोन हेलिकॉप्टरमध्ये हवेतच टक्कर झाली. या अपघातात जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला आहे. टोलो न्यूजने याची माहिती दिली आहे.
टोलो न्यूजनुसार दोन्ही हेलिकॉप्टरद्वारे कमांडोंना एका ऑपरेशनसाठी एका ठिकाणी उतरविण्यात येत होते. तसेच जखमी जवानांना नेण्यात येत होते. यावेळी दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली. या अपघातात घटनास्थळीच 8 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अद्याप पर्यंत अफगाणिस्तान हवाई दल किंवा संरक्षण मंत्रालयाने या अपघातावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही. तर प्रांतीय गव्हर्नरांचे प्रवक्ते ओमर जवाक यांनी नवा जिल्ह्यात दोन हेलिकॉप्टर आदळल्याचे म्हटले आहे. मात्र, या बाबत अधिक माहिती त्यांनी दिलेली नाही.
24 सप्टेंबरलाही अफगाणिस्तान हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला तांत्रिक दोषांमुळे अपघात झाला होता. यामध्ये दोन पायलटांचा मृत्यू झाला होता.