जेव्हा आपल्या स्वत:च्याच जिवाची शाश्वती नसेल, आपण जगू की मरू, हेच माहीत नसेल, तेव्हा माणूस किती हतबल होऊ शकतो याचं अतिशय भयावह आणि अस्वस्थ करणारं चित्र सध्या रोज अफगाणिस्तानात दिसतं आहे. तालिबाननं सत्ता ताब्यात घेतल्यानंतर सर्वाधिक घाबरल्या आहेत त्या तिथल्या महिला. अनेक महिलांची खुलेआम अब्रू लुटली जात आहे आणि अनेक महिलांना वाटतं आहे, आपण कधीही तालिबान्यांची ‘शिकार’ होऊ. आपण मेलो तरी बेहत्तर, पण आपल्या मागे आपल्या लहानग्या मुलांचं काय होणार याची चिंता त्यांना सतावते आहे. अफगाणिस्तानातील अनेक कुटुंबं काहीही करून देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे काबूल विमानतळावर लोकांची तोबा गर्दी होते आहे. ही गर्दी कमी व्हावी, लोकांनी थेट विमानात आणि विमानावर चढून बसू नये, पुन्हा काही दुर्घटना घडू नये यासाठी काबूल विमानतळावर आता काटेरी तारांची तटबंदी उभारण्यात आली आहे. या तारांच्या एका बाजूला आहेत अफगाणी नागरिक आणि तालिबानी तर दुसऱ्या बाजूला आहेत अमेरिका आणि ब्रिटनचे सैनिक.
तालिबान्यांच्या तावडीतून आपली सुटका होणार नाही, याची खात्रीच असलेल्या अनेक महिला निदान आपली मुलं तरी अत्याचारापासून वाचावीत, जगात कुठे का असेनात किमान जिवंत तरी राहावीत, यासाठी आपल्या लहानग्या मुलांना काटेरी तारांच्या कुंपणावरून थेट अमेरिकी आणि ब्रिटिश सैन्याच्या दिशेने फेकत आहेत. अनेक सैनिकांनी या मुलांना अलगद झेललं, तर काही मुलं तारांच्या काटेरी कुंपणात अडकून जखमीही झाली. आपल्याच बाळांपासून दूर जाताना या मातांचा आकांत पाहवत नाही, पण त्यांना एकच आशा आहे. आपल्याला तर देशातून बाहेर पडता येत नाही, पण हे सैनिक आपल्या मुलांना तरी अफगाणिस्तानबाहेर, त्यांच्या देशांत घेऊन जातील. तिथे कोणीतरी पालनहार त्यांना मिळेल, या नरकातून आपली मुलं वाचतील आणि जिवंत तरी राहतील. आपल्याच मुलांना आपल्यापासून दूर करताना, तारेच्या कुंपणावरून फेकताना या स्त्री-पुरुषांना किती यातना होत असतील, हे त्यांचं त्यांनाच माहीत, पण आपल्या कच्च्या बच्च्यांसाठी पालक किती हतबल होऊ शकतात, याचं हे अतिशय हृदयद्रावक चित्र सगळ्यांच्याच हृदयाला हात घालतं आहे.
कुठल्याही परिस्थितीत डगमगायचं नाही, समोर येईल त्या कठोर प्रसंगाला शेवटच्या क्षणापर्यंत हिमतीनं सामोरं जायचं, ही सैनिकांना शिकवण, पण हे दृश्य पाहून तारेपलीकडील सैनिकांनाही आपल्या डोळ्यांतील अश्रूंना बांध घालता येत नाही, अशी परिस्थिती आहे. धाय मोकलून रडताना तेही हेलावून गेले आहेत. मुलांना ते आपल्यासोबत घेऊनही जाऊ शकत नाहीत आणि मोठ्या आशेने आपल्याकडे ‘फेकलेल्या’ या मुलांना परत त्यांच्या पालकांकडेही देऊ शकत नाहीत, अशी या सैनिकांची विचित्र कोंडी झाली आहे.काही अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्याधिकाऱ्यांनी सांगितलं, अशा परिस्थितीत काय करावं, याबाबत आमचाही गोंधळ झाला आहे. आमच्या अनेक सैनिकांचीही आम्हाला काळजी वाटते आहे. कारण हे दृश्य पाहून आमचा एकही सैनिक रडल्यावाचून राहिलेला नाही. आता त्यांचं मानसिक समुपदेशन आम्हाला करावं लागत आहे.
एका ब्रिटिश सैन्याधिकाऱ्यानं सांगितलं, सगळ्याच मुलांना आम्ही झेलू शकलो नाही, सुरक्षितपणे आमच्या ताब्यात घेऊ शकलो नाही, काही मुलं तारांत अडकून जखमीही झाली, पण ‘आमच्या मुलांना वाचवा’ असं म्हणत त्यांना आमच्या दिशेनं फेकणाऱ्या मातांचा आक्रोश एखाद्या राक्षसाच्या हृदयालाही पाझर फोडणारा होता. विमानळाकडे जाणाऱ्या नागरिकांना, महिलांना तालिबानी सैनिक एकीकडे झोडपत होते, गोळीबार करीत होते, तर कसंही करून विमानतळावर आणि त्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी नागरिक जिवाचा आटापिटा करीत होते.या घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला, परदेशी एनजीओसोबत काम करीत असलेला एक तरुण म्हणाला, मीही माझ्या कुटुंबियांसोबत विमानतळाच्या दिशेनं पळत होतो. तालिबानी गोळीबार करीत होते, पण नागरिक थांबायला तयार नव्हते, कारण त्यांना माहीत आहे, तालिबान्यांच्या तावडीत सापडून जिवंत राहणं हे मृत्यूपेक्षाही भयानक आहे. एक तरुण म्हणाला, फ्रेंच दूतावासाच्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं, तुझं नाव, गाव, पत्ता, फोन नंबर एका कागदावर लिहून दे, आम्ही तुला अफगाणबाहेर नेण्यासाठी मदत करू. त्याचं बोलणं ऐकताच विमानतळावरील शेकडो लोकांमध्ये कागद, पेन मिळविण्यासाठी झुंबड उडाली. कानद-पेनसाठी त्यांनी अक्षरश: भीक मागायला सुरुवात केली. ही माहिती किती खरी, हे कोणालाच माहीत नव्हतं; पण ‘काडीचा’ आधारही सोडायला कोणीच तयार नाही, अशी ही भयाण अवस्था माणुसकीला हतबल करणारी आहे.
‘ते आमची अब्रू लुटतील !...’तालिबानी आपल्याला वासनेची शिकार बनवतील, याबाबत महिलांना जणू खात्रीच आहे. त्यामुळे विवाहिता आपल्या बाळांसाठी चिंतित आहेत, तर दुसरीकडे तरुण मुलीही आपली अब्रू वाचविण्यासाठी काबूल विमानतळावरील अमेरिकन सैनिकांकडे आपल्या प्राणांची भीक मागताना आक्रंदन करीत आहेत. तालिबानी येताहेत, ते आम्हाला ‘सोडणार’ नाहीत, असा या दुर्दैवी महिलांचा आक्रोश आहे.