नैरोबी- नैऋत्य केनिय़ामध्ये सध्या एक मोठी भौगोलिक घटना घडत आहे. या प्रदेशात भूमीवर एक मोठी भेग पडली असून ही भेग दिवसेंदिवस मोठीच होत चालली आहे. या भेगेमुळे नैरोबी-नॅरोक महामार्गाचे नुकसानही झाले आहे.
पृथ्वीवरील विविध खंड हे एखाद्या तरंगत्या तबकांसारखे आहेत. त्यांना प्लेट्स किंवा भूतबके असं म्हटलं जातं. या भूतबकांच्या हालचालींना भूविवर्तनीय हालचाली किंना प्लेट टेक्टोनिक्स असे म्हटले जाते. आपले सध्याचे खंड हे एकाच पॅन्जिया नावाच्या खंडापासून बनले असावेत असे समजले जाते. पृथ्वीच्या निर्मितीनंतर पृथ्वीवर टेथिस नावाचा समुद्र निर्माण झाला. त्यावर पॅन्जिया हा खंड तरंगत होता. त्याचे नंतर अंगारा आणि गोंडवाना असे दोन भाग झाले. आजचे हे खंड त्यांपासूनच तयार झाले असे समजले जाते. पृथ्वीवर या भूविवर्तनीय हालचाली (प्लेट टेक्टोनिक्स) सतत होत असतात. आता अफ्रिकेत सुरु असलेल्या हालचाली त्याच्याशीच संबंधीत असाव्यात असे सांगण्यात येत आहे.
काही दशलक्ष वर्षांच्या काळानंतर ही दरी पूर्ण वाढत जाऊन आफ्रिकेचे दोन भाग पडतील असे सांगण्यात येत आहे. केनयामधील ही दरी १९ मार्चरोजी दृष्टीस पडली असून ती ५० फूट रुंदीची आहे ती आणखी रुंदावतच चालील आहे. या भेगेमुळे आजूबाजूच्या काही घरांचे नुकसान झाले आहे आणि त्यामुळे काही घरांचा पाया डळमळीत होऊन घरेही कोसळली आहेत.